VIDEO- पतीवर चालून आलेल्या हल्लेखोरांना तिने लावलं पळवून
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2018 12:49 PM2018-02-05T12:49:01+5:302018-02-05T12:58:26+5:30
उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये एका पत्रकारावर हल्ला झाल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.
लखनऊ- उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये एका पत्रकारावर हल्ला झाल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये चार-पाच जण आबिदल अली नावाच्या पत्रकाराला मारहाण करताना दिसत आहेत. या हल्लेखोरांना उत्तर देण्यासाठी त्या पत्रकाराच्या पत्नीने मोठं धाडस दाखविलं आहे. पत्रकाराच्या पत्नीने घरातून रिवॉल्व्हर आणून त्या हल्लेखोरांवर फाररिंग सुरू केल्याचं व्हिडीओमध्ये दिसतं आहे. गोळीबार सुरू होताच हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढला.
रिपोर्ट्सनुसार, हा व्हिडीओ लखनऊच्या काकोरी भागातील आहे. एक व्यक्ती पत्रकार आबिद अली यांच्या घराबाहेर उभा असलेला पाहायला मिळतो आहे. त्या व्यक्तीच्या हातात काही कागदपत्र आहेत. सुरूवातीला लॉक असलेल्या गेटमधून आबिद त्या व्यक्तीशी बोलत होते. नंतर त्यांनी घरातून चावी आणून दरवाज्याचं लॉक उघडलं. दोघांमध्ये काही संभाषण झालं. व्हिडीओमध्ये दिसणारा व्यक्ती अत्यंत साधारण दिसतो आहे. ही व्यक्ती पत्रकारावर हल्ला करेल असं कुठेही वाटत नव्हतं.
काही वेळाने आणखी चार लोक पत्रकाराच्या घराबाहेर आली आणि त्यांनी अचानक त्यांच्यावर हल्ला केला. हल्लेखोर आबिद अली यांना खेचून घराबाहे नेताना दिसत आहेत. हल्लेखोरांनी लाथा-बुक्क्यांनी आबिद यांना मारहाण केली. त्यातील एकाने मोठ्या काठीने त्यांना मारहाण केली. आबिद यांचा आवाज ऐकुन त्यांची पत्नी हातात रिव्हॉल्वर घेऊन बाहेर आल्याचं पाहायला मिळालं. सुरूवातीला आबिद यांना सोडण्याची विनंती त्यांच्या पत्नीने केली पण तरीही मारहाण बंद न झाल्याने त्यांनी फायरिंग करायला सुरूवात केली. पत्नीने सुरू केलेली फायरिंग पाहता त्या हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढल्याचं पाहायला मिळालं.
दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी पुढील तपास सुरू केला आहे.