'प्री-विडींग शूटसाठी पाण्यात गेले अन् प्रतापसागर बंधाऱ्याचे दरवाजे उघडले'
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2021 12:50 PM2021-11-10T12:50:31+5:302021-11-10T12:52:59+5:30
राजस्थानच्या चितौडगढ येथील रावताभाटा परसरातील निसर्गरम्य स्थळावर प्री-विडींग करण्यासाठी जोडपं पोहोचलं होतं. त्याचवेळी, प्रतापसागर बांधाचे दरवाजे उघडण्यात आले
जयपूर - लग्न म्हटलं की फोटोग्राफी आणि शुटींग आलंच, त्यातही आता प्री-विडींग शूटसाठी भन्नाट प्रयोग केले जातात. फोटोग्राफरच्या आयडिया आणि नवदाम्पत्यांची हौस भागविण्यासाठी निसर्गरम्य ठिकाणांवर फोटोशूट करतात. चितौडगढच्या रावतभाटा क्षेत्रातील कोटा येथून आलेल्या एका जोडप्याला प्री विडींगचं शूट करणं चांगलंच महागात पडलं आहे. चुलिया वॉटरफॉलमध्ये फोटोशूट करताना हे कपल आणि त्यांचे मित्र पाण्यात अडकले होते. तब्बल 3 तासानंतर पोलीस आणि बचाव पथकाने त्यांची सुटका केली.
राजस्थानच्या चितौडगढ येथील रावताभाटा परसरातील निसर्गरम्य स्थळावर प्री-विडींग करण्यासाठी जोडपं पोहोचलं होतं. त्याचवेळी, प्रतापसागर बांधाचे दरवाजे उघडण्यात आले. त्यामुळे, चुलिया धबधब्यातील परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी आले. त्यामुळे, खडकावर बसून फोटोग्राफी करणाऱ्या जोडप्यांच्या चारही बाजूला पाणीच पाणी झाले होते. त्यामध्ये, आशिष गुप्ता, त्यांची भावी पत्नी शिखा, तसेच आशिषचा दोस्त हिमांशू व शिखाची मावस बहिण मिलन हे चारजण अडकून पडले. फोटोग्राफरने पाणी येण्यापूर्वी कशीबशी स्वत:ची सुटका केली. त्यानंतर, जवळील पोलीस यंत्रणेला यासंदर्भात माहिती दिली.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेताच, राणाप्रताप सागर बंधाऱ्याचे दरवाजे बंद करण्यात आले. त्यानंतर, बचाव पथकाने जवळपास 3 तासांचे शर्थीचे प्रयत्न करून पाण्यात अडकलेल्या जोडप्यासह त्यांच्या नातेवाईकांनी सुखरुप बाहेर काढले. सध्या, या जोडप्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. दरम्यान, दोन वर्षांपूर्वी येथे अशीच घटना घडली होती. त्यामध्ये, 3 जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. तेव्हापासून हा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केला आहे.