व्हिडिओ : बिहारमध्ये बालकांच्या मृत्यूसंदर्भातील बैठकीत आरोग्यमंत्री विचारतात 'मॅचचा स्कोर'
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2019 10:57 AM2019-06-18T10:57:00+5:302019-06-18T10:59:02+5:30
या घटनेचा व्हिडिओ एएनआयने ट्विट केला आहे. व्हिडिओमध्ये मंगल पांडे विचारतात की, मॅचचा स्कोर काय झाला. त्यावर मागून आवाज येतो की चार विकेट गेल्या आहे.
नवी दिल्ली - बिहारमधील मुजफ्फरपूरमध्ये एक्यूट इन्सेफेलाइटीस सिंड्रोममुळे (एइएस) १०० हून अधिक बालकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या घटनेनंतर आरोग्य विभागाच्या बैठकीतील एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. १०० हून अधिक बालकांच्या मृत्यूनंतर आयोजित बैठकीत बिहारचेआरोग्यमंत्री मंगल पांडे यांनी क्रिकेट मॅचचा स्कोर विचारला. बालमृत्यूच्या गंभीर विषयावर बैठक सुरू असताना क्रिकेट मॅचचा स्कोर विचारणे धक्कादायक मानले जात आहे.
या घटनेचा व्हिडिओ एएनआयने ट्विट केला आहे. व्हिडिओमध्ये मंगल पांडे विचारतात की, मॅचचा स्कोर काय झाला. त्यावर मागून आवाज येतो की चार विकेट गेल्या आहे. हा व्हिडिओ १६ जून रोजीचा असून त्याच दिवशी भारत-पाकिस्तान यांच्यात सामना सुरू होता. क्रिकेट सामन्याचे कुतूहल असणे सहाजिक आहे, परंतु, वेळ चुकीची होती, अशा प्रतिक्रिया सध्या सोशल मीडियावर येत आहेत.
#WATCH Bihar Health Minister Mangal Pandey asks for latest cricket score during State Health Department meeting over Muzaffarpur Acute Encephalitis Syndrome (AES) deaths. (16.6.19) pic.twitter.com/EVenx5CB6G
— ANI (@ANI) June 17, 2019
मागील १६ दिवसांत 'एइएस'मुळे मुजफ्फरपूर आणि आसपासच्या जिल्ह्यातील १२१ हून अधिक बालकांचा मृत्यू झाला आहे. यापैकी ९५ बालकांचे मृतदेह एकट्या मेडीकल कॉलेजमधून बाहेर काढण्यात आले. बिहारमध्ये गेल्या काही दिवसांपासून एक्यूट इन्सेफेलाइटीस सिंड्रोममुळे दररोज ८ ते ९ मुलांचा मृत्यू होत आहे. केंद्रीयमंत्री हर्षवर्धन यांनी देखील मुजफ्फरपूरमधील मेडीकल कॉलेजला भेट दिली. त्याचवेळी निशा नावाच्या एका चिमुरडीने अखेरचा श्वास घेतला होता.