'प्रत्येक घरातून हिजबुल्ला निघणार', जम्मू-काश्मीरमध्ये उमटले नसरुल्लाहच्या मृत्यूचे पडसाद
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2024 18:26 IST2024-09-29T18:25:41+5:302024-09-29T18:26:18+5:30
Jammu Kashmir : हिजबुल्ला प्रमुख हसन नसरल्लाहच्या मृत्यूनंतर जम्मू-काश्मीरमध्ये अनेक ठिकाणी निदर्शने करण्यात आली

'प्रत्येक घरातून हिजबुल्ला निघणार', जम्मू-काश्मीरमध्ये उमटले नसरुल्लाहच्या मृत्यूचे पडसाद
Jammu Kashmir : इस्रायलने शुक्रवारी(दि.27) लेबनॉनची राजधानी बेरुत येथे हवाई हल्ला करुन हिजबुल्लाचा प्रमुख हसन नसराल्लाह (Hassan Nasrallah) याचा खात्मा केला. त्यानंतर त्याचा चुलत भाऊ हाशिम सफिदीन याला हिजबुल्लाचा प्रमुख घोषित करण्यात आले आहे. दरम्यान, नसराल्लाहच्या मृत्यूचे पडसाद आपल्या जम्मू-काश्मीरमध्येही पाहायला मिळत आहे. या घटनेविरोधात येथे आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलक विद्यार्थ्यांनी 'प्रत्येक घरातून हिजबुल्ला निघणार,' असे म्हटले.
नसरल्लाहच्या मृत्यूनंतर जागतिक दहशतवादी हाशिम सफीद्दीन बनला हिजबुल्लाचा प्रमुख
जम्मू-काश्मीरमध्ये निदर्शने
न्यूज एजन्सी एएनआयच्या वृत्तानुसार, हसन नसरल्लाह याच्या मृत्यूनंतर जम्मू-काश्मीरच्या बडगाममध्ये लोकांनी रस्त्यावर जोरदार निदर्शने केली. यावेळी लोकांच्या हातात नसराल्लाह याचे पोस्टरही होते. याशिवाय जुन्या श्रीनगर शहरासह राज्यातील इतर भागातही अशीच निदर्शने झाली.
'प्रत्येक घरातून हिजबुल्ला निघणार'
यावेळी एका आंदोलक विद्यार्थ्यींनीने इस्रायलवर संताप व्यक्त केला. "मी पॅलेस्टाईनच्या विरोधात असलेल्या प्रत्येक व्यक्तीशी बोलत आहे. लेबनॉनच्या लोकांनी अजिबात चिंता करू नये. आम्ही त्यांची साथ कधीही सोडणार नाही. तुम्हाला माहित नाही, तुम्ही कोणाला शहीद केले आहे. आता प्रत्येक घरातून हिजबुल्ला निघेल," असे ती म्हणाली.
#WATCH | A protest march was held in Jammu & Kashmir's Budgam against the killing of Hezbollah chief Hassan Nasrallah by the Israel Defence Force (IDF). pic.twitter.com/EhTYAMFKRd
— ANI (@ANI) September 28, 2024
दरम्यान, इस्रायली वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, नसराल्लाहशिवाय त्याची मुलगी झैनब हिचाही या हवाई हल्ल्यात मृत्यू झाला आहे. इस्रायलने हल्ला केलेल्या कमांडर सेंटरमध्ये नसरल्लाह याच्यासह मुलीचाही मृतदेह सापडला होता. नसराल्लाह आणि इराण समर्थित गटाचे इतर अनेक नेते लेबनॉनची राजधानी बेरुतमध्ये एका बंकरमध्ये जमले असताना इस्रायलने हा हल्ला केला.