Video: तुम्ही विष पाजलं तर...; पोलिसांकडून चहा पिण्यास अखिलेश यादव यांचा नकार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2023 03:43 PM2023-01-08T15:43:46+5:302023-01-08T15:47:48+5:30
पोलीस मुख्यालयात पोहोचल्यानंतर, तेथे एकही जबाबदार अधिकारी नसल्यावरुन अखिलेश यांनी पोलिसांना विचारणा केली
लखनौ - उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये रविवारी गोंधळ पाहायला मिळाला. समाजवादी पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांनी समाजवादी पक्षाचे ट्विटर हँडल समन्वयक जगन अग्रवाल यांच्या अटकेला विरोध दर्शवला. त्यादरम्यान, पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव हेही पोलीस मुख्यालयात पोहोचल्याचं दिसून आलं. त्यावेळी, एक मजेशीर घटना घडली. पोलिसांनीअखिलेश यादव यांना चहाचं निमंत्रण दिलं, त्यासाठी चहाही आणायला सांगितला. मात्र, अखिलेश यांनी चहा पिण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला. तसेच, चहा न पिण्याचे कारण सांगितल्यावर पोलीस आयुक्तांनाही हसू आलं.
पोलीस मुख्यालयात पोहोचल्यानंतर, तेथे एकही जबाबदार अधिकारी नसल्यावरुन अखिलेश यांनी पोलिसांना विचारणा केली. येथील भेटीचा समाजवादी पक्षाने एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये, अखिलेश यादव हे पोलिसांशी चर्चा करताना दिसून येतात. त्यावेळीस पोलिसांकडून चहाची विचारणा करण्यात येते. त्यावर, अखिलेश यांनी मिश्कील आणि तितकीच गंभीर प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही येथील चहा पिणार नाही, आम्ही आमचा स्वत:चा चहा घेऊन येऊ. तुमच्याकडून केवळ कप घेऊ असे त्यांनी म्हटले. त्यावर, पोलिसांनी आमचा चहा का नको, असे विचारताच अखिलेश यांनी उत्तर दिले, त्यावर अनेकजण हसले. तुम्ही चहात टाकून विष दिलं तर... तुमचा काही भरवशा नाही, अशा शब्दात अखिलेश यांनी पोलिसांना सुनावलं. सध्या अखिलेश यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
#WATCH समाजवादी पार्टी प्रमुख अखिलेश यादव ने पुलिस मुख्यालय में चाय पीने से इंकार किया।
— ANI_HindiNews (@AHindinews) January 8, 2023
उन्होंने कहा,"हम यहां की चाय नहीं पियेंगे। हम अपनी (चाय) लाएंगे, कप आपका ले लेंगे। हम नहीं पी सकते, ज़हर दे दोगे तो? हमें भरोसा नहीं। हम बाहर से मंगा लेंगे।"
(वीडियो सोर्स: समाजवादी पार्टी) pic.twitter.com/zwlyMp8Q82
दरम्यान, लखनौमधील भाजपा युवा मोर्चाच्या सोशल मीडिया प्रमुख डॉ. ऋचा राजपूत यांनी समाजवादी पक्षाच्या ट्विटर हँडलविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली आहे. समाजवादी पार्टी मीडिया सेल नावाच्या ट्विटर हँडलवरुन आपणास रेप आणि जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे. याप्रकरणी त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल कली असून थेट युपीचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनाच जबाबदार धरले आहे. त्यावरुन, भाजप आणि सपामध्ये वाद सुरू आहे. त्यातून पोलिसांनी अटकेची कारवाई केली आहे.