Video : भारताला ९९ वर्षांच्या भाडेतत्त्वावर स्वातंत्र्य मिळालंय; भाजप प्रवक्त्याचा अजब दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2021 11:53 AM2021-10-28T11:53:18+5:302021-10-28T11:54:55+5:30
Ruchi Pathak Controversial Statements: भारताला ९९ वर्षांच्या भाडेतत्त्वावर स्वातंत्र्य मिळालं असल्याचा दावा भाजप प्रवक्त्या रूची पाठक यांनी झांसीमधील एका कार्यक्रमादरम्यान केला.
भाजपच्या एका महिला प्रवक्त्यानं (Spokeperson) भारताच्या स्वातंत्र्याबद्दल मोठा दावा केला आहे. एका मीडिया डिबेटदरम्यान त्यांनी केलेल्या वक्तव्यावरून सर्वांनाच धक्का बसला."भारताला स्वातंत्र्य आता मिळालंच नाही. भारताला स्वातंत्र्य ९९ वर्षांच्या भाडेतत्त्वावर मिळालं आहे. देश हा पूर्णपणे स्वतंत्र नाही. याबाबत लेखी करार करण्यात आला होता," असं अजब वक्तव्य झांसीमधील भाजप प्रवक्त्या रूची पाठक (BJP Spokeperson Ruchi Pathak) यांनी केलं. यानंतर अनेक ठिकाणाहून त्यांच्यावर टीका करण्यात आली.
सोशल मीडियावरुन अनेक नेटकऱ्यांनी त्यांच्या या वक्तव्याचा समाचार घेतला. अनेकांनी त्यांना व्हॉट्सअॅप युनिव्हर्सिटीचं टॉपर असं संबोधलं. त्यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मात्र त्यांनी माघार घेतल्याचं दिसून आलं. आपल्याला जी माहिती मिळाली ती सोशल मीडियाद्वारे (Social Media) मिळाल्याचं त्या म्हणाल्या. तसंच यावेळी त्यांनी राजीव दीक्षित यांच्या वक्तव्याचा उल्लेख केला.
Watch at your own risk 😂😂
— @I'mSebastin (@AdagaleSebastin) October 26, 2021
BJP speaker Ruchi Pathak is the topper of WhatsApp University 2021 🎉🎉..
pic.twitter.com/vnBkX2gf0S
झांसीमध्ये लल्लनटॉपनं एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमादरम्यान भाजपच्या स्थानिक प्रवक्त्या रुची पाठकही उपस्थित होत्या. यावेळी खासगीकरणावरून काँग्रेसचे प्रवक्ते गौरव जैन यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. यावेळी त्यांनी एअर इंडियाच्या विक्रीचाही उल्लेख केला. यावेळी भाजपनं आपली बाजू मांडली. "भारताचं स्वातंत्र्य हे काँन्ट्रॅक्ट बेस आहे. काँग्रेसने ९९ वर्षांच्या भाडेतत्त्वावर स्वातंत्र्य घेतचलं आहे. भारत पूर्णपणे स्वतंत्र नाही. ब्रिटीश कायद्याची शपथ घेण्यात आली होती. निवडणुका नंतर घेण्यात आल्या आणि १९५१ मध्ये भारताचं संविधान लागू करण्यात आलं," असंही त्या यावेळी म्हणाल्या. भारताचं स्वातंत्र्य हे ९९ वर्षांच्या भाडेतत्त्वावर घेण्यात आल्याचं स्पष्ट होत असल्याचंही त्यांनी सांगितलं.
त्यांच्या या वक्तव्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. यावरून अनेकांनी त्यांच्यावर टीका केली. तसंच काही नेटकऱ्यांनी त्या व्हॉट्सअॅप युनिव्हर्सिटीच्या टॉपस असल्याचं म्हटलं. यानंतर रूची पाठक यांनी आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं.