कडक सॅल्यूट! जोरदार बर्फवृष्टीत गर्भवती महिलेच्या मदतीसाठी जवानांची 6.5 किमीची पायपीट
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2022 08:51 PM2022-01-10T20:51:19+5:302022-01-10T20:58:50+5:30
Video Indian Army Rescue Pregnant Woman : हाडं गोठवणाऱ्या थंडीत, जोरदार बर्फवृष्टीमध्ये भारतीय जवानांनी गर्भवती महिलेला रुग्णालयात नेण्यास मदत केली आहे.
नवी दिल्ली - भारतीय सैन्य देशाच्या सीमेच्या रक्षणासह कायमच गरजू नागरिकांच्या मदतीसाठी पुढे येतं. जम्मू-काश्मीरमध्ये अशीतच एक कौतुकास्पद घटना घडली आहे. हाडं गोठवणाऱ्या थंडीत, जोरदार बर्फवृष्टीमध्ये भारतीय जवानांनी गर्भवती महिलेला रुग्णालयात नेण्यास मदत केली आहे. या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. बोनियार तहसीलमधील नियंत्रण रेषेला लागून असलेल्या घग्गर हिल गावातून सेनेने आपत्कालीन स्थलांतर केलं. जवानांच्या या कामगिरीचं सर्वत्र भरभरून कौतुक केलं जात आहे.
खराब रस्ते आणि कठीण परिस्थितीतही जवानांनी महिलेला बोनियार येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सुरक्षितरित्या पोहचवलं. मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय सेनेला 8 जानेवारी रोजी सकाळी 10.30 वाजता एक कॉल आला. यात स्थानिक लोकांनी गर्भवती महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला तातडीने वैद्यकीय मदत मिळवून देण्याची विनंती केली होती. महिलेची प्रकॉती गंभीर होती. आपत्कालीन कॉलनंतर सेनेची मेडिकल टीम घटनास्थळी दाखल झाली.
They safeguard the nation & serve the citizens. They are saviours.
— Ankur🇮🇳™ (@unapologeticAnk) January 9, 2022
Indian Army helps a pregnant woman in snowfall.#IndianArmy🇮🇳💪🇮🇳#JaiHind🇮🇳🇮🇳 pic.twitter.com/n1QUXSbchI
महिलेची प्राथमिक तपासणी केल्यानंतर गंभीर प्रकृती लक्षात घेता आपत्कालीन स्थितीतून बाहेर काढण्यासाठी नियोजन करण्यात आलं. सततच्या बर्फवृष्टीमुळे वाहन चालवणं अतिशय कठीण होतं. त्यामुळे सैन्याकडून स्ट्रेचर तयार करण्यात आलं. तब्बल 6.5 किलोमीटर पायपीट करून स्ट्रेचरवर महिलेला नेण्यात आलं आणि त्यानंतर पुढे रुग्णवाहिकेतून सार्वजनिक आरोग्य केंद्रात पोहोचवण्यात आलं. कडाक्याच्या थंडीत, सततच्या बर्फवृष्टीत सेनेने 6.5 किलोमीटरचं अंतर पार करुन रुग्णाला सुरक्षितरित्या रुग्णालयात पोहोचवलं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.