Video: पाकिस्तानी खेळाडूसमोर 'जय श्री राम'च्या घोषणा; उदयनिधी स्टॅलिन यांची नाराजी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2023 04:39 PM2023-10-15T16:39:28+5:302023-10-15T16:41:38+5:30
सनातन धर्मावर केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आलेले उदयनिधी स्टॅलिन यांनी सामन्यातील एक व्हिडिओ पोस्ट केला आहे.
IND vs PAK: तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन, यांचे सुपूत्र उदयनिधी स्टॅलिन पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. सनातन धर्मावर केलेल्या वक्तव्याचा वाद अजून शमलेला नाही, यातच आता त्यांनी आणखी एका वादाला तोंड फोडले आहे. शनिवारी अहमदाबादमध्ये झालेल्या भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान प्रेक्षकांनी पाकिस्तानी खेळाडूंसमोरही 'जय श्री राम'च्या घोषणा दिल्या, यावरुन उदयनिधी यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
उदयनिधी यांनी या सामन्याचा व्हिडिओ शेअर करून नाराजी व्यक्त केली आहे. हा व्हिडीओ मैदानातील आहे, ज्यात एक पाकिस्तानी खेळाडू पॅव्हेलियनमध्ये परतताना प्रेक्षक मोठ्याने 'जय श्री राम'च्या घोषणा देत आहेत. उदयनिधी यांनी, हे अस्वीकार्य असल्याचे म्हटले आहे. पाकिस्तानी खेळाडूंसोबत असे वर्तण योग्य नसल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. त्या खेळाडूच्या टी-शर्टवर 16 नंबर लिहिलेला दिसतोय, यावरुन तो क्रिकेटपटू रिझवान असल्याचे स्पष्ट झाले आहे.
India is renowned for its sportsmanship and hospitality. However, the treatment meted out to Pakistan players at Narendra Modi Stadium in Ahmedabad is unacceptable and a new low. Sports should be a unifying force between countries, fostering true brotherhood. Using it as a tool… pic.twitter.com/MJnPJsERyK
— Udhay (@Udhaystalin) October 14, 2023
या पोस्टमुळे अनेक क्रिकेट चाहत्यांनी उदयनिधी यांना ट्रोल केले. काही नेटकऱ्यांनी क्रिकेटर मोहम्मद रिझवानचा एक व्हिडिओ पोस्ट केला, ज्यात तो मैदानात नमाज अदा करताना दिसतोय. हा व्हिडिओ नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्याचा असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच, वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानचा सामना 10 ऑक्टोबर रोजी श्रीलंकेशी झाला होता, यामध्ये पाकिस्तानचा विजय झाला. मोहम्मद रिझवानने हा विजय गाझामधील पॅलेस्टिनी जनतेला समर्पित केला. यावरुनही लोकांनी ट्रोल केले.