VIDEO: 'जिवंत आहे, गोळ्या घाला', व्हिडीओमुळे भोपाळ चकमकीवर प्रश्नचिन्ह
By admin | Published: November 1, 2016 10:40 AM2016-11-01T10:40:05+5:302016-11-02T12:02:53+5:30
सिमीच्या (स्टुडंट इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडिया) आठ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आल्यानंतर एक मोबाईल व्हिडीओ समोर आला आहे ज्यामुळे पोलिसांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे
Next
>ऑनलाइन लोकमत
भोपाळ, दि. 1 - सिमीच्या (स्टुडंट इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडिया) आठ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आल्यानंतर एक मोबाईल व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत पोलीस कारवाई करताना दिसत असून एका पोलिसाचा आवाजही ऐकू येत आहे, ज्यामध्ये तो 'जिवंत आहे, त्याला मारा, गोळ्या घाला', असं बोलतोय. तर अजून एक आवाज येत आहे जो 'छातीत मार, तो मरेल', असं बोलत आहे. या व्हिडीओमुळे पोलिसांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. हेड कॉन्स्टेबलची हत्या केल्यानंतर सोमवारी पहाटे भोपाळच्या मध्यवर्ती कारागृहातून पळून गेलेले सिमीचे दहशतवादी इटखेडी भागातील अचारपुरा येथे चकमकीत मारले गेले.
एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार आतापर्यंत दोन व्हिडीओ समोर आले आहेत. एका व्हिडीओत पोलीस गोळ्या घालताना दिसत आहेत, तर दुस-या व्हिडीओमध्ये दहशतवादी आत्मसमर्पण करण्यास तयार असतानाही पोलीस फायरिंग करत असल्याचं दिसत आहे. या व्हिडीओमधील सत्यता तपासली जात आहे.
व्हिडीओत काही लोक दूर अंतरावर उभे असलेले दिसत आहेत. त्यावेळी कोणीतरी बोलताना ऐकू येत आहे की 'थांबा, त्या पाच जणांना आपल्याशी बोलायचं आहे. तिघेजण पळून जाण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना घेरा', आणि काही वेळातच गोळ्यांचा आवाज ऐकू येत आहे.
मोहम्मद खालिद अहमद, मुजीब शेख, मेहबूब गुड्डू, जाकीर हुसैन सादीक, अमजद, मोहम्मद सालिक, माजिद खालिद आणि अकील खिलची अशी ठार झालेल्या दहशतवाद्यांची नावे आहेत.
दहशतवादी फरार झाल्याने भोपाळ सेंट्रल जेलच्या अधीक्षकांसह तिघांना निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर शहरभर हाय अलर्ट जारी करुन, पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात आली होती. पळालेल्या दहशतवाद्यांचा तपास अत्यंत वेगाने सुरु करण्यात आला होता. दरम्यान विरोधकांनी मात्र चकमकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे.
सिमी ही दहशतवादी संघटना आहे. 25 एप्रिल 1977 रोजी अलिगढमध्ये ‘सिमी’ची स्थापना झाली. 2001 साली सरकारने या संघटनेवर बंदी आणली. आतापर्यंत मध्यप्रदेशातून सिमीचे सर्वात जास्त दहशतवादी अटक करण्यात आले आहेत.