हृदयद्रावक! 2 वर्षीय भावाच्या मृतदेहासह बसून होता चिमुकला, वडील शोधत राहिले रुग्णवाहिका
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2022 12:42 PM2022-07-11T12:42:27+5:302022-07-11T12:42:51+5:30
एक 8 वर्षांचा मुलगा आपल्या 2 वर्षांच्या लहान भावाचा मृतदेह आपल्या मांडीवर घेऊन बसल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
नवी दिल्ली - मध्य प्रदेशमध्ये एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मुरैना येथे शनिवारी एक 8 वर्षांचा मुलगा आपल्या 2 वर्षांच्या लहान भावाचा मृतदेह आपल्या मांडीवर घेऊन बसल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलाचे वडील पूजाराम जाटव मृत मुलाचा मृतदेह घरी नेण्यासाठी रुग्णवाहिका शोधत होते. मिळालेल्या माहितीनुसार, मुरैना जिल्ह्यातील अंबाह भागातील बडफरा गावातील पूजाराम जाटव यांचा दोन वर्षांचा मुलगा राजा याची तब्येत अचानक बिघडली.
सुरुवातीला पूजाराम यांनी आपल्या मुलाला घरीच बरं करण्याचा प्रयत्न केला, मात्र मुलाला पोटदुखी असह्य झाल्याने त्यांनी त्याला मुरैना जिल्हा रुग्णालयात नेलं. त्यांचा मोठा मुलगा गुलशन हाही पूजारामसोबत रुग्णालयात गेला होता. मुरैना जिल्हा रुग्णालयात राजाचा मृत्यू झाला. गरीब पूजारामने रूग्णालयाच्या अधिकाऱ्यांकडे मृतदेह परत गावी नेण्यासाठी रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्याची विनंती केली, परंतु त्यांनी त्याची मागणी धुडकावून लावली. त्यामुळे पूजाराम आपल्या मुलाचा मृतदेह घेऊन रुग्णालयाबाहेर आले आणि रस्त्यावर बसले.
दुसऱ्या वाहनाने घरी जाण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते. त्यामुळे त्यांनी आपला मोठा मुलगा गुलशनला मृतदेहासह हॉस्पिटलच्या बाहेर सोडलं आणि मुलाचा मृतदेह घरी नेण्याची व्यवस्था करण्यासाठी ते बाहेर पडले. पूजाराम यांचा मोठा मुलगा गुलशन आपल्या मृत भावाचं डोकं त्याच्या मांडीवर घेऊन अर्धा तास तिथेच बसून होता. मात्र, रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या लोकांना मृतदेहासोबत बसलेला छोटा मुलगा दिसला आणि तिथे गर्दी जमली. त्या जमलेल्या गर्दीतील लोकांनी अधिकाऱ्यांना माहिती दिल्यावर पोलिसांनी रुग्णवाहिकेची व्यवस्था केली आणि मुलांसह पुजाराम जाटव यांनी घरी सोडण्यास सांगितलं.
पूजाराम जाटव यांनी आज तकला दिलेल्या माहितीनुसार, "मुलाची आई घरी नाही. मी गरीब माणूस आहे आणि माझ्या मुलाने काय खाल्लं आणि त्याची तब्येत बिघडली हे मला माहीत नाही. मी डॉक्टरांना दाखवल्यावर त्यांनी मला इनो आणि हिंग द्यायला सांगितलं, मी मुलाला ते दिलं, पण त्याच्या तब्येतीत सुधारणा झाली नाही. मुलाचा मृत्यू झाल्यानंतर मला हॉस्पिटलमधून रुग्णवाहिकेसाठी पैसे मागितले जात होते." आज तकने याबाबतचे वृत्त दिले आहे.