Video: शानदार, जबरदस्त... देशातील पहिल्या बुलेट ट्रेनच्या पहिल्या टर्मिनलची झलक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2023 11:33 AM2023-12-08T11:33:53+5:302023-12-08T11:38:18+5:30
मुंबई-अहमदाबाद हाय स्पीड रेल कॉरिडोरवर युद्धपातळीवर काम सुरू आहे.
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींना देशाला बुलेट ट्रेनचं स्वप्न दाखवलं असून ते सत्यातही उतरत आहे. बुलेट ट्रेनच्या धर्तीवर देशात केंद्र सरकारने वंदे भारत एक्सप्रेस सुरू केली असून त्यासही प्रवाशांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. तर, दुसरीकडे मुंबई ते अहमदाबाद या पहिल्या बुलेट ट्रेनचे कामही वेगाने होत आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी त्यांच्या ट्विटर हँलडवरुन या कामाची पहिली झलक शेअर केली आहे. अहमदाबादच्या साबरमती मल्टीमॉडल ट्रांसपोर्ट हबमध्ये उभारण्यात आलेलं देशातील पहिल्या बुलेट ट्रेन टर्मिनल व्हिडिओ त्यांनी शेअर केला आहे.
मुंबई-अहमदाबाद हाय स्पीड रेल कॉरिडोरवर युद्धपातळीवर काम सुरू आहे. देशाला पहिली बुलेट ट्रेन ऑगस्ट २०२६ मध्ये मिळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी व्हिडिओ शेअर करत बुलेट ट्रेनच्या प्रोजेक्टची झलकच देशवासीयांना दाखवली आहे. देशाचा सांस्कृतिक वारसा आणि आधुनिक वास्तुकलेचा उत्तम नमूना म्हणजे अहमदाबादमधील ''साबरमती मल्टीमॉडल ट्रांसपोर्ट हब'' हे बुलेट ट्रेनचे टर्मिनल आहे.
Terminal for India's first bullet train!
— Ashwini Vaishnaw (@AshwiniVaishnaw) December 7, 2023
📍Sabarmati multimodal transport hub, Ahmedabad pic.twitter.com/HGeoBETz9x
दरम्यान, भारतातील महत्त्वाकांक्षी बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे काम वेगाने सुरू आहे. १०० किमी लांबीचा पूल पूर्ण झाला असून, २५० किमीसाठी खांब उभारण्यात आले आहेत. देशातील ही पहिली बुलेट ट्रेन मुंबई ते अहमदाबाद दरम्यान धावणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी १४ सप्टेंबर २०१७ रोजी अहमदाबादमध्ये या प्रकल्पाचे उद्घाटन केले होते. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी गुरुवारी २३ नोव्हेंबर रोजी बुलेट ट्रेन प्रकल्पाची झलक दर्शविणारा व्हिडिओ शेअर करत प्रकल्पाच्या प्रगतीशी संबंधित माहितीही दिली होती. आता, त्यांनी बुलेट ट्रेनचं देशातील पहिलं टर्मिनल उभारण्यात आल्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यांनी शेअर केलेल्या व्हिडिओवर नेटीझन्सकडून अनेक चांगल्या प्रतिक्रिया येत आहेत.
दरम्यान, बुलेट ट्रेनसाठी नॅशनल हाय-स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने (एनएचएसआरसीएल) दिलेल्या माहितीनुसार, बुलेट ट्रेन प्रकल्पांतर्गत ४० मीटर लांबीचे फुल स्पॅन बॉक्स गर्डर व सेगमेंट गर्डर जोडून १०० किमीचा मार्ग बांधण्यात आला आहे.