VIDEO: मनोज तिवारींनी उडवली रांगेत उभे राहणा-यांची खिल्ली
By Admin | Published: January 4, 2017 11:11 AM2017-01-04T11:11:35+5:302017-01-04T11:21:17+5:30
अभिनेते आणि भाजपा खासदार मनोज तिवारी यांनी नोटाबंदी निर्णय जाहीर झाल्यानंतर एटीएम आणि बँकांच्या रांगेत उभे राहणा-यांची खिल्ली उडवली आहे
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 4 - एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी नोटाबंदी निर्णयाला समर्थन दिल्याबद्दल देशवासियांचे आभार मानत असताना दुसरीकडे त्यांच्याच पक्षाचे खासदार सामान्यांची खिल्ली उडवत असल्याचं दिसत आहे. अभिनेते आणि भाजपा खासदार मनोज तिवारी यांनी नोटाबंदी निर्णय जाहीर झाल्यानंतर एटीएम आणि बँकांच्या रांगेत उभे राहणा-यांची खिल्ली उडवली आहे. एका खासगी पार्टीत सर्वांसमोर आपण कशाप्रकारे लोकांना देशासाठी रांगेत उभं राहण्याचं आवाहन केल्याचं सांगत खिल्ली उडवत आहेत. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटाबंदी निर्णयाची घोषणा केल्यानंतर काही लोकांनी निर्णयाला समर्थन केलं तर काहीजण निर्णयाच्या विरोधात होते. सोशल मीडियावर प्रत्येकजण आपली भूमिका मांडत होता. यामधून काहींनी मोदींचा निर्णय योग्य असल्याचं सांगितलं, तर काहींनी हे चूक असल्याची टीका केली. इंटरनेटवर सोशल युद्धच सुरु झालं होतं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पण या निर्णयामुळे सर्वात जास्त जर कोणाला त्रास झाला असेल तर तो सामान्य माणूस हेदखील तितकंच खरं.
नोटाबंदी निर्णय जाहीर झाल्यानंतर दुस-याच दिवसापासून बँका आणि एटीएमबाहेर लोकांच्या रांगा लागल्या. यावेळी राजकीय नेत्यांनी आपल्याला किती चिंता आहे दाखवण्यासाठी लोकांची भेट घेतली. काही जण तर रांगेत उभे राहिले. भाजपा खासदार मनोज तिवारदेखील त्या नेत्यांपैकी एक होते. त्यांनी रांगेत उभं राहिलेल्यांची भेट घेतली आणि देशभक्तीवर भाषण देत आपल्याला चांगल्या भविष्यासाठी थोडा त्रास सहन करावा लागेल असं आवाहन केलं होतं. पण त्यांचा खासगी पार्टीतील हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर टीका होऊ लागली आहे.