सीडीएस बिपिन रावत यांचा तो व्हिडीओ संदेश ठरला अखेरचा, मृत्यूपूर्वी २४ तास आधीच केला होता रेकॉर्ड
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2021 01:29 PM2021-12-12T13:29:44+5:302021-12-12T13:46:30+5:30
CDS Bipin Rawat: दिवंगत बिपिन रावत यांचा हा व्हिडीओ मेसेज १९७१ च्या युद्धाला ५० वर्षे पूर्ण झाल्याप्रित्यर्थ आयोजित स्वर्णिम विजय पर्व कार्यक्रमामध्ये दाखवला गेला. या कार्यक्रमासाठी त्यांचा हा व्हिडीओ ७ डिसेंबर रोजी रेकॉर्ड केला गेला होता.
नवी दिल्ली - देशाचे पहिले सीडीएस जनरल बिपिन रावत हे आता या जगात राहिले नाहीत. ८ डिसेंबर रोजी तामिळनाडूमधील कुन्नूर येथे झालेल्या भीषण हेलिकॉप्टर अपघातामध्ये त्यांचे निधन झाले होते. दरम्यान, आता जनरल बिपिन रावत यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. निधन होण्यापूर्वी एक दिवस आधी त्यांनी तो रेकॉर्ड केला होता. त्यामध्ये त्यांनी १९७१ च्या युद्धातील विजय दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या होता. तसेच हौतात्म पत्करलेल्या जवानांना अभिवादन केले होते.
दिवंगत बिपिन रावत यांचा हा व्हिडीओ मेसेज १९७१ च्या युद्धाला ५० वर्षे पूर्ण झाल्याप्रित्यर्थ आयोजित स्वर्णिम विजय पर्व कार्यक्रमामध्ये दाखवला गेला. या कार्यक्रमासाठी त्यांचा हा व्हिडीओ ७ डिसेंबर रोजी रेकॉर्ड केला गेला. तर ८ डिसेंबर रोजी झालेल्या भीषण हेलिकॉप्टर अपघातात बिपिन रावत यांचे निधन झाले होते.
या व्हिडीओमध्ये जनरल रावत म्हणाले होते की, स्वर्णिम विजय पर्वानिमित्त मी भारतीय लष्कराच्या सर्व बहादूर जवानांना मी हार्दिक शुभेच्छा देतो. भारतीय लष्कराच्या १९७१ च्या युद्धातील विजयाचा ५० वा वर्धापन दिन आम्ही विजयपर्व म्हणून साजरा करत आहोत. मी या पवित्र पर्वानिमित्त सशस्त्र सेनादलांच्या वीर जवानांचे स्मरण करून त्यांच्या बलिदानाला श्रद्धांजली अर्पण करतो.
स्वर्णिम विजय पर्वाबाबत माहिती देताना त्यांनी सांगितले की, १२ ते १४ डिसेंबरपर्यंत इंडिया गेटवर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हे विजय पर्व अमर जवान ज्योतीच्या छायेमध्ये होत आहे, ही सौभाग्याची गोष्ट आहे. आम्ही सर्व देशवासियांना या विजयपर्वाच्या आनंदसोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रित करत आहोत. आमच्या सेनादलांचा आम्हाला अभिमान आहे. चला एकत्र येऊन विजय पर्व साजरे करू या, जय हिंद.