Video : खोटं बोलला म्हणून पोटच्या पोराला अमानुष मारहाण, वडिलांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2018 12:04 PM2018-01-28T12:04:01+5:302018-01-28T12:06:15+5:30
पुन्हा खोटं बोलणार नाही, असं म्हणत हा मुलगा आपल्या चुकीबद्दल वडिलांकडे माफी मागतो, पण त्याच्याकडे आणि आईकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून वडील त्याला गादीवर उचलून फेकतात, दोन-तीन वेळेस गादीवर आपटल्यानंतर ते त्याला गादीवरून थेट खाली उचलून आपटतात. इतक्यावरच न थांबता खाली पडलेल्या आपल्याच मुलाला हा बाप लाथ मारून निघून जातो.
बंगळुरू : बंगळुरूमध्ये एका पित्याने आपल्याच 10 वर्षाच्या मुलाला पट्टयाने अमानुष मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी पोलिसांनी 30 वर्षीय पित्याला अटक करण्यात आली आहे.
लहान मुलं आपली एखादी लहानशी चूक लपवण्यासाठी अनेकदा खोटं बोलतात. खोटं बोलल्याचं समजल्यावर आई-वडिलांकडून त्याला ओरडा बसतो, पुन्हा खोटं बोलू नये यासाठी त्याची समजूत काढली जाते, तर कधी फटके देखील बसतात. पण वडिलांशी खोटं बोलणं पश्चिम बंगळुरुच्या केंगेरी परिसरातील या चिमुकल्याला इतकं महागात पडलं की त्याच्या बापाने त्याला अक्षरशः पट्ट्याने अमानुष मारहाण करण्यास सुरूवात केली. बेदम मारहाण करताना पाहून मुलाच्या आईने मारझोड थांबवण्याची विनंती केली पण त्याचाही काही उपयोग झाला नाही.
पुन्हा खोटं बोलणार नाही, असं म्हणत हा मुलगा आपल्या चुकीबद्दल वडिलांकडे माफी मागतो, पण त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून वडील त्याला गादीवर उचलून फेकतात, दोन-तीन वेळेस गादीवर आपटल्यानंतर ते त्याला गादीवरून खाली उचलून आपटतात. इतक्यावरच न थांबता खाली पडलेल्या आपल्याच मुलाला हा बाप लाथ मारून निघून जातो.
ही घटना दोन महिन्यापूर्वीची असून, मुलाच्या आईनेच व्हिडीओ बनवल्याची माहिती आहे. आईचा मोबाईल खराब झाल्यावर मोबाईल सर्व्हिस सेंटरमध्ये दुरुस्तीसाठी दिला होता. मोबाईलमधील डेटा डिलीट करु नये, अशी विनंती कंपनीकडे त्यांनी केली होती. त्यावेळी सर्व्हिस सेंटरमधील एका व्यक्तीने हा व्हिडीओ पाहिला. व्हिडीओ पाहिल्यावर त्याने याची माहिती तात्काळ एका स्वयंसेवी संस्थेला दिली आणि अखेर शनिवारी सकाळी मारहाण करणा-या पित्याला पोलिसांनी अटक केली.
पाहा व्हिडीओ -