VIDEO - मुलायम सिंह यादव यांच्या सूनबाईंनी पद्मावतीमधील 'घुमर' गाण्यावर केला डान्स, सोशल मीडियावरुन धमकी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2017 03:22 PM2017-11-29T15:22:40+5:302017-11-29T15:35:25+5:30
पद्मावती चित्रपटावरुन आता मुलायम सिंह यादव यांच्या छोटया सूनबाई अपर्णा यादव अडचणीत आल्या आहेत.
लखनऊ - पद्मावती चित्रपटावरुन आता मुलायम सिंह यादव यांच्या छोटया सूनबाई अपर्णा यादव अडचणीत आल्या आहेत. सध्या संपूर्ण देशात संजय लीला भन्साळी यांच्या पद्मावती चित्रपटावरुन मोठा वाद सुरु आहे. करणी सेनेसह काही संघटनांनी हा चित्रपट प्रदर्शित झाल्यास गंभीर परिणाम दिसतील अशी धमकी दिली आहे. राजपूत समाजाच्या तीव्र भावना लक्षात घेऊन काही राज्यांनी या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदीही घातली आहे.
या परिस्थिती समाजवादी पार्टीचे नेते मुलायम सिंह यादव यांच्या छोटया सूनबाई अपर्णा यादव यांनी पद्मावती चित्रपटातील 'घुमर' गाण्यावर नृत्य सादर केले. लखनऊ येथील एका कार्यक्रमात अपर्णा यादव यांनी घुमर गाण्यावर डान्स केला. त्यांच्या नृत्याचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावरुन अनेकांनी अपर्णा यादव यांना धमकी दिली आहे.
अपर्णाचे प्रतीक यादव बरोबर लग्न झाले आहे. प्रतीक मुलायम सिंह यादव यांच्या दुस-या पत्नीचा मुलगा आहे. व्हिडिओमध्ये अपर्णा यादव घुमर गाण्यावर समूह नृत्य करताना दिसत आहेत. लखनऊमध्ये आपल्या भावाच्या साखरपुडयाच्या कार्यक्रमात अपर्णा यादव यांनी घुमर गाण्यावर नृत्य सादर केले. उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली सरकारने पद्मावती चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घातली आहे. बिहार, मध्य प्रदेश, पंजाब, राजस्थान आणि गुजरात या राज्यांमध्येही पद्मावतीवर बंदी आहे.
#WATCH Aparna Yadav,daughter in law of Mulayam Singh Yadav performs on the 'Ghoomar' song of #Padmavati at a function in Lucknow pic.twitter.com/3BkCcprJsm
— ANI UP (@ANINewsUP) November 29, 2017
भाजपा नेते सूरज पाल अमूनी दिली दीपिका पादुकोणला धमकी
हरियाणामधील भाजपाचे मीडिया प्रमुख संयोजक सूरज पाल अमू यांनी अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि संजय लीला भन्साळी यांचं शीर कापून आणणा-याला 10 कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं. याचवेळी त्यांनी सिनेमात अल्लाऊद्दीन खिलजीची भूमिका करणा-या रणवीर सिंहचे पाय तोडण्याचीही धमकी दिली आहे. 'आम्हाला कायदा घातात घ्यायचा नाहीये. पण जर कुणी आमच्या बहिणी आणि मुलींकडे नजर उचलून पाहिलं तर त्याला शिक्षा करण्यात येणार', असं सूरजपाल अम्मू म्हणाले होते.
'पद्मावती'वरुन वादग्रस्त वक्तव्य करणा-या मंत्री आणि मुख्यमंत्र्यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारलं
पद्मावती चित्रपटावरुन वादग्रस्त वक्तव्य करणा-या उच्च पदावरील अधिकारी, मंत्री आणि मुख्यमंत्र्यांना सर्वोच्च न्यायालयाने आज चांगलंच फटकारलं. सेन्सॉर बोर्ड जोपर्यंत चित्रपटाला हिरवा कंदील देत नाही तोपर्यंत वादग्स्त वक्तव्यं करणं टाळलं पाहिजे असं मत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केलं. संजय लिला भन्साळी दिग्दर्शित 'पद्मावती' चित्रपट भारताबाहेर प्रदर्शित करण्यावर बंदी आणण्यात यावी अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली.