Video: 'नरेंद्र मोदीच पाकिस्तानचे एजंट; आधी शरीफांशी मैत्री, आता इम्रान खानशी दोस्ती'
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2019 03:54 PM2019-04-12T15:54:20+5:302019-04-12T15:55:47+5:30
समाजवादी पक्षाचे नेते आणि रामपूर लोकसभा मतदारसंघाचे सपा उमेदवार आजम खान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे
रामपूर - समाजवादी पक्षाचे नेते आणि रामपूर लोकसभा मतदारसंघाचे सपा उमेदवार आजम खान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. नरेंद्र मोदी हे पाकिस्तानचे एजंट आहेत अशी टीका आजम खान यांनी केली. रामपूरमध्ये जनसभेला संबोधित करताना आजम खान यांनी हा आरोप केला आहे.
काही दिवसांपूर्वी पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी परदेशी पत्रकारांशी बोलताना नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास काश्मीर मुद्द्यावर सकारात्मक चर्चा होऊ शकते असं वक्तव्य केलं होतं. याच वक्तव्यावरुन आजम खान यांनी हा आरोप केला. यावेळी बोलताना आजम खान म्हणाले की, नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावे असं पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांना वाटते. मग लोकांनी सांगावं पाकिस्तानचा खरा एजंट कोण आहे? असा सवाल त्यांनी उपस्थित जनतेला केला.
#WATCH Azam Khan, Samajwadi Party in Rampur: Aap kal Nawaz Sharif ke dost the, aur aaj Imran Khan aapke dubara Wazir-e-Azam banne ka intezaar kar raha hai. Batao logon, Pakistan ka agent main hun ya ... ? (11.04.2019) pic.twitter.com/TBO4yrUftG
— ANI UP (@ANINewsUP) April 12, 2019
त्याचसोबत पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यासोबतही तुमची मैत्री होती आणि आजचे पंतप्रधान इमरान खान यांच्याशी सुद्धा तुमची मैत्री आहे. तुम्ही आमच्यावर पाकिस्तानी एजंट असल्याचा आरोप करता असं सांगत आजम खान यांनी पाकिस्तानचा एजंट मी आहे की कोण आहे असा प्रश्न विचारताच उपस्थित जनतेमधून मोदी मोदी उत्तर देण्यात आलं.
पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांना परदेशी पत्रकारांनी भारताच्या निवडणुकीवर प्रश्न विचारला होता. यावेळी इमरान खान यांनी सांगितले होते की, जर भारतात पुन्हा नरेंद्र मोदी आणि त्याचा पक्ष भारतीय जनता पार्टी निवडणुकीत जिंकून आला तर भारत आणि पाकिस्तानमधील शांतता आणि काश्मीरसारखा प्रश्न सोडवण्याची चांगली संधी आहे. इमरान खान यांच्या या वक्तव्यानंतर पाकिस्तानमध्ये इमरान यांच्याविरोधी पक्षाने टीका केली होती. तसेच भारतातही इमरान खान यांच्या वक्तव्याचे पडसाद पाहायला मिळत आहे. दरम्यान इमरान खान यांच्या वक्तव्याचा माध्यमांनी विपर्यास केला असल्याचं पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री महमूद कुरैशी यांनी सांगितले आहे.
एअर स्ट्राईकवर संशय घेणारे पाकिस्तानचे भाषा बोलत आहेत अशी टीका भाजपाकडून करण्यात येते. त्यामुळे पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी देशाच्या निवडणुकीबाबत केलेल्या वक्तव्यावरुन विरोधकांकडून भाजपाला घेरण्याचा प्रयत्न होत असताना दिसून येत आहे.