VIDEO: लग्नाला वर्षही लोटलं नव्हतं, पत्नीनं असा दिला शहीद मेजर धोंडियाल यांना अखेरचा निरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2019 12:41 PM2019-02-19T12:41:05+5:302019-02-19T12:47:05+5:30
दक्षिण काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील एका चकमकीत मेजर आणि चार सुरक्षा जवान शहीद झाले.
डेहराडून- दक्षिण काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील एका चकमकीत मेजर आणि चार सुरक्षा जवान शहीद झाले. या चकमकीत जैश-ए-मोहम्मदच्या चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात लष्कराला यश आलं. काल झालेल्या चकमकीत जैश-ए-मोहम्मदच्या कामरानसहीत तीन दहशतवाद्यांना खात्मा करण्यात आला. या चकमकीत उत्तराखंडच्या डेहराडूनमधील मेजर व्ही. एस. धोंडियालही शहीद झाले. आज त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला.
याचदरम्यान एक फोटो व्हायरल झाला आहे. ज्यात शहीद मेजर धोंडियाल यांची पत्नी त्यांना सलाम करताना दिसत होती. त्यांचं लग्न गेल्या वर्षीच झालं असून, लग्नाला वर्षंही लोटलं नव्हतं. मेजर धोंडियाल यांचं गेल्या वर्षी एप्रिलमध्ये नितिका कौल हिच्याशी लग्न झालं होतं. नितिका या बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये कार्यरत आहेत. त्यांना पती शहीद झाल्याची खबर मिळताच त्या डेहराडूनमध्ये पोहोचल्या आणि त्यांनी पतीला सलाम ठोकत शेवटचा निरोप दिला. पुलवाम्यातील पिंगलान परिसरात सोमवारी (18 फेब्रुवारी) पहाटे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. दहशतवाद्यांविरोधात लढताना एका मेजरसह चार जवानांना वीरमरण आले, तर एक जण जखमी झाला आहे. परिसरातील एका घरामध्ये दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर सोमवारी पहाटे सुरक्षा दलांनी शोधमोहीम सुरू केली असता दहशतवाद्यांनी जवानांवर अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात चार जवानांना वीरमरण आले आणि एक जवान जखमी झाला आहे. शहीद झालेल्या चार जवानांमध्ये मेजर दर्जाच्या अधिकाऱ्याचा समावेश आहे.