"तुम्हारी नौकरी खाऊंगी..."; मुख्यमंत्री निवासस्थानातील स्वाती मालिवाल यांचा धक्कादायक व्हिडीओ समोर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2024 02:20 PM2024-05-17T14:20:33+5:302024-05-17T14:39:56+5:30
Swati Maliwal : आप खासदार स्वाती मालिवाल यांचा मुख्यमंत्री निवासस्थानातील व्हिडीओ सनोर आल्याने खळबळ उडाली आहे.
Swati Maliwal Assault Case : आपच्या खासदार स्वाती मालिवाल यांना झालेल्या मारहाणीच्या प्रकरणाची सध्या देशभरात चर्चा सुरु झाली आहे. स्वाती मालिवाल यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी बेदम मारहाण झाल्याची तक्रार सोमवारी दिल्ली पोलिसांकडे फोन करुन दिली होती. त्यानंतर स्वाती मालिवाल यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अरविंद केजरीवाल यांचे माजी स्वीय साहायक विभव कुमार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करत त्यांचा तपास सुरु केला. मात्र आता या प्रकरणी त्या दिवशी घडलेल्या घटनेचा एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.
खासदार स्वाती मालिवाल यांच्यासोबत गैरवर्तन आणि मारहाण केल्याच्या प्रकरणात एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडीओ १३ मे चा असून मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातील असल्याचे सांगितले जात आहे. मात्र लोकमत याची पुष्टी करत नाही. दुसरीकडे मालिवाल यांनी कोणाचेही नाव न घेता, तो स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे, पण एक दिवस सत्य जगासमोर येईल, असं म्हटलं आहे.
व्हीडिओमध्ये स्वाती मालिवाल या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी बसल्या असून तिथले सुरक्षा कर्मचारी त्यांना बाहेर जाण्यास सांगत आहेत. याच दरम्यान त्या विभव कुमार यांच्यावर रागावताना दिसत आहेत. "आज मी लोकांना सांगणार आहे. काय करायचे ते करा. तुझी नोकरी खाऊन टाकेन. माझं पोलीस उपायुक्तांसोबत बोलणं करुन द्या. मी आधी सिव्हील लाईन्स पोलिसांसोबत बोलणार आहे. जे होईल ते इथेच होईल. तू मला हात लावलास तर मी तुझी नोकरी खाईन," असे स्वाती मालिवाल बोलत असल्याचे म्हटलं जात आहे.
त्यावेळी तिथले सुरक्षा कर्मचारी स्वाती मालिवाल यांना विनंती करताना दिसत आहेत. यावल बोलताना स्वाती मालिवाल या 'मी आत्ताच ११२ वर फोन केला आहे, पोलिस येऊ द्या, मग बोलू,असे म्हणतात. यावर कर्मचारी बाहेर पोलीस येतील, इथे येणार नाहीत, असे म्हणतात. त्यावर बोलताना आता जे होईल ते आतमध्येच होईल, पोलीस आत येतील,असे मालिवाल म्हणाल्या.