Video : वीरपुत्राच्या आई-वडिलाचं विमानात 'अभिनंदन', टाळ्या वाजवून स्टँडिंग ओव्हेशन
By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2019 04:43 PM2019-03-01T16:43:44+5:302019-03-01T16:43:50+5:30
भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्या सुटकेसाठी भारताकडून मोठे प्रयत्न सुरू होते.
पाकिस्तानच्या तावडीत असणारे भारताचे वीरपुत्र विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांचे आई-वडिल आपल्या मुलाच्या स्वागतासाठी वाघा बॉर्डरवर आले आहेत. तत्पूर्वी ते दिल्ली विमानतळावरुन अमृतसर येथे पोहोचले होते. त्यावेळी, विमानाती प्रवाशांकडून अभिनंदन यांच्या आई-वडिलांचा स्टॅँडिग ओव्हेशन देऊन सन्मान करण्यात आला. तर दिल्ली विमानतळावरही वीरपुत्राच्या माता-पित्यांचे टाळ्यांच्या गजरात स्वागत करण्यात आले. पाकिस्तानच्या हवाई हल्ल्याला परतावून लावताना, विंग कमांडर अभिनंदन हे पाकिस्तानच्या हद्दीत अडकले होते.
भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्या सुटकेसाठी भारताकडून मोठे प्रयत्न सुरू होते. त्यानुसार पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी गुरुवारी दुपारी पाकिस्तानी संसदेत घोषणा केली. इम्रान खान यांची ही घोषणा म्हणजे भारतापुढे पत्करलेली शरणागती असल्याचे मानले जात असून, भारताचा तसेच आंतरराष्ट्रीय दबाव यांमुळेच पाकिस्तानला हा निर्णय घ्यावा लागला आहे. त्यांची सुटका होणार असल्याच्या वृत्ताने भारतात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. तर, थोड्यच वेळात अभिनंदन यांना वाघा बॉर्डरवर आणण्यात येणार असून तत्पूर्वी अभिनंदन यांचे आई-वडिल वाघा बॉर्डरकडे रवाना झाले होते. त्यावेळी विमानप्रवासात त्यांना सुखद अनुभव आला. गुरुवारी रात्री चेन्नई ते दिल्ली असा विमानप्रवास करुन अभिनंदन यांचे आई-वडिल बॉर्डरसाठी रवाना होत होते. त्यावेळी दिल्ली विमानतळावर त्यांच्या विमानाचे लँडिंग झाल्यानंतर कुठलाही गोंधळ, किंवा प्रवाशांची बाहेर पडण्यासाठी लगबग दिसली नाही. कारण, या प्रवाशांचे हात टाळ्या वाजवून सन्मान करण्यात गुंतले होते. विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्या माता-पित्यांचा हा सन्मान होत होता. देशसेवेसाठी पाकिस्तानमध्ये जाऊन धमक दाखविणाऱ्या वीरपुत्राचा हा सन्मान होता. प्रवाशांनी सर्वप्रथम अभिनंदन यांच्या आई-वडिलांना वाट मोकळी करुन दिली. सर्वप्रथम या माता-पित्यांना वाट देत त्यांनी त्यांच्यासोबत फोटोही काढले. प्रवाशांच्या या सन्मानामुळे अभिनंदन यांचे आई-वडिल भारावून गेले होते.
पाहा व्हिडीओ -
#अभिनंदन यांच्या आई-वडिलांचे टाळ्यांच्या गडगडाटात स्वागत#Abhinanadan#Abhinandanfamily#IndianAirForcepic.twitter.com/wgjUqY7Un8
दरम्यान, अभिनंदन यांची वाघा बॉर्डरवरुन भारतात एंट्री होईल. त्यानंतर, अमृतसर विमानतळावरुन त्यांना दिल्ली येथे नेण्यात येणार आहे.