VIDEO - धक्कादायक! बंदुकीच्या धाकावर तरुण इंजिनिअरचे अपहरण करुन जबरदस्तीने लावले लग्न
By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2018 10:53 AM2018-01-06T10:53:11+5:302018-01-06T11:00:13+5:30
आतापर्यंत आपण अनेकदा विवाहाच्या मांडवातून मुलीला पळून नेण्याच्या घटना ऐकल्या आहेत. चित्रपटात तशी दुश्ये पाहिली आहेत. पण बिहारमध्ये बिलकुल याउलट एक घटना घडली.
पाटणा - आतापर्यंत आपण अनेकदा विवाहाच्या मांडवातून मुलीला पळून नेण्याच्या घटना ऐकल्या आहेत. चित्रपटात तशी दुश्ये पाहिली आहेत. पण बिहारमध्ये बिलकुल याउलट एक घटना घडली. बंदुकीच्या धाकावर एका 29 वर्षीय इंजिनिअरचे अपहरण करुन त्याला लग्नासाठी थेट विवाहाच्या मांडवात आणण्यात आले. बिहारमधील पाटणा येथील पांडाराक भागात ही धक्कादायक घटना घडली.
विनोद कुमार असे पीडित इंजिनिअरचे नाव असून तो बोकारो स्टील प्लांटमध्ये ज्यूनियर इंजिनिअर पदावर नोकरीला आहे. अपहरण केल्यानंतर विनोद कुमारला मारहाण करण्यात आली. त्यानंतर त्याला जबरदस्तीने विवाहासाठी मांडवात बसवण्यात आले. ही जबरदस्ती सुरु असताना विनोद कुमार अक्षरक्ष: रडून मदतीसाठी याचना करत होता. पण मुलीकडच्या बाजूच्या महिला लग्नाच्या विधीमध्ये त्याने सहकार्य करावे यासाठी विनोद कुमारची समजूत घालत होत्या.
विनोद कुमारने जेव्हा वधूला कुंकू लावण्याचा विधी करायला नकार दिला तेव्हा मुलीकडचे म्हणाले आम्ही फक्त तुझे लग्न लावत आहोत तुला फासावर लटकवलेले नाही. एका कॉमन मित्राच्या लग्नामध्ये आपली वधूपक्षाकडच्या एका नातेवाईकाबरोबर ओळख झाली तिथे त्या नातेवाईकाने आपल्या डोक्याला बंदुक लावली व लग्नाला भाग पाडले असा आरोप विनोद कुमारने केला आहे. पोलीस विनोद कुमारच्या आरोपांची चौकशी करत आहेत.
मागच्या महिन्यात जेव्हा ठरल्याप्रमाणे विनोद घरी परतला नाही तेव्हा त्याचा भाऊ संजय कुमारने पोलीस ठाणे गाठले. संजयला एक अज्ञात व्यक्तीने फोन करुन तुझ्या भावाचे जबरदस्तीने लग्न लावण्यात आले आहे अशी माहिती दिली. त्याने ती माहिती पोलिसांना सांगितली. पण पोलिसांनी मदतीला नकार दिला असा आरोप संजयने केला आहे.
तीन डिसेंबरला माझा भाऊ बोकारो येथून हातिया-पाटणा एक्सप्रेसने पाटण्याजवळ एका लग्नाला गेला होता. तिथे सुरेंद्र यादवबरोबर त्याची भेट झाली. सुरेंद्र यादवने विनोदला मोकाला येथे येण्यासाठी सांगितले. विनोद मोकाला येथे पोहोचल्यानंतर त्याचे अपहरण करुन जबरदस्तीने त्याचे लग्न लावण्यात आले असा आरोप संजयने केला आहे. पोलिसांनी मदत नाकारल्यानंतर संजयने पाटण्याचे पोलीस अधीक्षक मनू महाराज यांची भेट घेतली. त्यांनी आदेश दिल्यानंतर पांडाराक पोलिसांनी विनोद कुमारची त्या गावातून सुटका केली. लग्नानंतर विनोद कुमारला जबरदस्तीने तिथे ठेवण्यात आले होते.