Video: ब्रिटीश संसदेत मोदींविरुद्ध भाषण, राष्ट्रवादीने शेअर केला व्हिडिओ; भाजपचाही पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2022 08:34 PM2022-05-20T20:34:30+5:302022-05-20T20:38:54+5:30
भारतात सध्या सुरू असलेल्या धर्मांध राजकारणाविषयी चिंता व्यक्त करताना गुजरात दंगलींचा दाखला सईदा वारसी यांनी दिला
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसने केंद्रातील भाजप सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. एका ब्रिटीश खासदाराच्या भाषणाचा व्हिडिओ शेअर करत राष्ट्रवादीने मोदींना लक्ष्य केलं आहे. ब्रिटीश खासदार आणि वकील सईदा वारसी यांनी नुकत्याच हाऊस ऑफ लॉर्ड्स या ब्रिटीश संसदेच्या वरिष्ठ सदनात पंतप्रधान मोदी यांच्या कार्यपद्धतीवरच मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मोदी नीती ही भारताच्या विकासासाठी सही नीती नसल्याचे सूतोवाच त्यांनी आपल्या या भाषणातून केले आहे. तसेच, देशातील धार्मिक वातावरणावरही त्यांनी भाष्य केलंय.
भारतात सध्या सुरू असलेल्या धर्मांध राजकारणाविषयी चिंता व्यक्त करताना गुजरात दंगलींचा दाखला सईदा वारसी यांनी दिला. गुजरातमध्ये २००२ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री मोदींच्या नेतृत्वाखाली आम्ही जे पाहिले तेच आता आम्ही पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात संपूर्ण भारतामध्ये पाहत आहोत, असे त्यांनी म्हटलं आहे. तसेच, हे अत्यंत दुःखद आहे.
ब्रिटीश नेत्या आणि वकील @SayeedaWarsi यांनी नुकत्याच हाऊस ऑफ लॉर्ड्स या ब्रिटीश संसदेच्या वरिष्ठ सदनात पंतप्रधान मोदी यांच्या कार्यपद्धतीवरच मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मोदी नीती हा भारताच्या विकासासाठी सही नीती नसल्याचे सूतोवाच त्यांनी आपल्या या भाषणातून केले. @PMOIndiapic.twitter.com/2GjcBVQLaD
— NCP (@NCPspeaks) May 20, 2022
मोदी म्हणजे भारत नाही आणि मोदीजी मांडत असलेली संकल्पना ही महात्मा गांधीजींची भारताची संकल्पना नाही. धार्मिक विखार आणि हिंसक विचार पेरणारी विचारसरणी म्हणजे हिंदू धर्म आणि हिंदुत्व नाही, अशी टीकाही सईदा यांनी यावेळी संसदेतील भाषणात केली आहे. राष्ट्रवादीच्या अधिकृत अकाऊंटवरुन खासदार त्यांचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. आता, या व्हिडिओला भाजपनेही प्रत्युत्तर दिलंय. भाजपने या व्हिडिओतील खासदारांचे कनेक्शन थेट पाकिस्तानशी जोडले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा भारताच्या न्यायव्यवस्थेपेक्षा जास्त विश्वास मुळच्या पाकिस्तानी वंशाच्या असणाऱ्या परदेशी खासदारांवर आहे का?
देशाच्या पंतप्रधानांवर होणाऱ्या खोट्या आरोपांचा वापर करून स्वतःची राजकीय पोळी भाजण्याचीच @PawarSpeaks साहेबांची शिकवण आहे का? https://t.co/pKjzOtR9l0— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) May 20, 2022
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा भारताच्या न्यायव्यवस्थेपेक्षा जास्त विश्वास मुळच्या पाकिस्तानी वंशाच्या असणाऱ्या परदेशी खासदारांवर आहे का?, असा प्रतिसवाल भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसला केला आहे. तसेच, देशाच्या पंतप्रधानांवर होणाऱ्या खोट्या आरोपांचा वापर करून स्वतःची राजकीय पोळी भाजण्याचीच शरद पवार यांची शिकवण आहे का?, असेही त्यांनी म्हटले.