VIDEO: 'ऐ दिल...' वर बहिष्कार टाका, गोव्याच्या पोलीस महासंचालकांचं आवाहन
By admin | Published: November 2, 2016 05:37 PM2016-11-02T17:37:59+5:302016-11-02T17:47:26+5:30
ऐ दिल है मुश्किल मोहम्मद रफी यांचा अपमान केला असल्याने गोव्याचे पोलीस महासंचालक मुकेश चंदेर यांनी चित्रपटावर बहिष्कार टाकण्याचं आवाहन केलं आहे
Next
ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. 2 - वादात अडकल्यानंतर अखेर रिलीज झालेल्या 'ऐ दिल है मुश्किल' चित्रपटाची मुश्किल अजून काही संपता संपत नाही आहे. चित्रपटात पाकिस्तानी कलाकार फवाद खान असल्याने अगोदरच अनेकांची चित्रपटावर बहिष्कार टाकला असताना चित्रपटात मोहम्मद रफी यांचा अपमान केल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे गोव्याचे पोलीस महासंचालक मुकेश चंदेर यांनी स्वत: या घटनेचा निषेध केला असून चित्रपटावर बहिष्कार टाकण्याचं आवाहन केलं आहे.
मुकेश चंदेर यांनी ट्विटरच्या माध्यमातून लोकांना चित्रपटावर बहिष्कार टाकण्याचं आवाहन केलं असून नाराजी व्यक्त केली आहे. 'मोहम्मद रफी भारतातील एक महान गायक होते, आणि यासाठी कोणाच्याही प्रमाणपत्राची गरज नाही. जर तुम्ही खरंत रफींचे चाहते असाल तर चित्रपटावर बहिष्कार टाका', असं ट्विट मुकेश चंदेर यांनी केलं आहे.
एनडीटीव्हीने मुकेश चंदेर यांच्याशी संपर्क साधला असता 'मी संगीताचा आणि रफी यांचा चाहता आहे. जर एखादी गोष्ट खटकत असेल तर ती पाहू नये. मी पाहणार नाही. रफींच्या करोडो चाहत्यांना दुखावण्यात आलं आहे. संगीताचा चाहता म्हणून हे माझं वैयक्तिक मत आहे,' असं बोलले आहेत.
I am musically connected to Rafi Saheb & play his songs on flute. Any uttrance against a great singer hurts his millions of fans like me.
— Muktesh Chander IPS (@mukteshchander) November 2, 2016
चित्रपटात अनुष्का शर्माचा एक डायलॉग आहे. ज्यामध्ये 'मोहम्मद रफी ? ते गायचे कमी, रडायचे जास्त ना ?' असं बोलताना दिसत आहे. मोहम्मद रफी यांचा मुलगा शाहीद रफी यांनी करण जोहरला सार्वजनिक माफी मागण्यास सांगितलं असून सीन डिलीट करायला सांगितलं आहे. गायक सोनू निगमनेही या वादानंतर ट्विट केलं आहे.
‘ऐ दिल है मुश्किल’ या चित्रपटामध्ये अभिनेता रणबीर कपूर, ऐश्वर्या राय बच्चन, अनुष्का शर्मा यांची प्रमुख भूमिका आहे. या चित्रपटातील पाकिस्तानी कलाकार फवाद खानच्या भूमिकेमुळे मोठा वाद निर्माण झाला होता. जम्मू-काश्मीरमधील उरी येथे पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २० जवान शहीद झाल्यानंतर भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राइक करून ३८-४० दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर देशात पाकिस्तानविरोधी वातावरण निर्माण झाले होते. शिवसेना, मनसे या राजकीय पक्षांनी पाक कलाकार, खेळाडू, गायक यांच्याविरोधात भूमिका घेत त्यांना भारतात काम करू देण्यास विरोध दर्शवला होता. त्यामुळे करण जोहरचा ' ए दिल' चित्रपट अडचणीत सापडला होता. अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीनंतर मनसेने चित्रपटाला सशर्त परवानगी दिली.
Is it true that there is a a dialogue in Ai dil hai mushkil that says Mohd Rafi gaate kum rote zyaada thhey?
— Sonu Nigam (@sonunigam) October 31, 2016