Video: इस्रोच्या शास्त्रज्ञांपुढे भाषण करताना PM भावूक, मोदींच्या डोळ्यात आनंदाश्रू
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2023 01:55 PM2023-08-26T13:55:48+5:302023-08-26T14:00:18+5:30
मोदींनी ग्रीसहून थेट बंगळुरू गाठले आणि इस्रोच्या कमांड सेंटरमध्ये शास्त्रज्ञांची भेट घेतली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी विदेश दौऱ्याहून थेट बंगळुरुत इस्रोतील शास्त्रज्ञांच्या भेटीला पोहोचले. भारताने जगात उल्लेखनीय कामगिरी करत चंद्रयान ३ चं यशस्वी लँडींग केलं. भारताच विक्रम रोलर चंद्रावर सुरक्षितपणे उतरल्याने जगभरातून भारताचं आणि इस्रोचं कौतुक होत आहे. हा ऐतिहासिक क्षण कोट्यवधी भारतीयांनी आपल्या डोळ्यात साठवला. त्यावेळी, पंतप्रधान विदेश दौऱ्यावर होते. त्यांनी तेथूनच भारतीयांचं आणि शास्त्रज्ञांचं अभिनंदन केलं. त्यामुळेच, भारतात येताच ते इस्रोच्या शास्त्रज्ञांचं कौतुक व अभिनंदन करायला पोहोचले. यावेळी, भाषण करताना मोदी भावुक झाल्याचं पाहायला मिळालं.
मोदींनी ग्रीसहून थेट बंगळुरू गाठले आणि इस्रोच्या कमांड सेंटरमध्ये शास्त्रज्ञांची भेट घेतली. पंतप्रधानांनी इस्रोच्या वैज्ञानिकांना सलाम केला आणि या मोहिमेसाठी त्यांचे अभिनंदन केले. मोदी म्हणाले, "आपण काय केलं हे देशवासीयांना कळलं पाहिजे. हा प्रवास सोपा नव्हता. मून लँडरचे सॉफ्ट लँडिंग सुनिश्चित करण्यासाठी, शास्त्रज्ञांनी एक आर्टिफिशियल देखील बनवलं. विक्रम लँडरवर उतरून त्याची चाचणी घेण्यात आली. लँडर पोहोचला आहे. तिथे जाण्यासाठी खूप परीक्षा दिल्या, त्यामुळे यश मिळणार हे निश्चित होत, असे मोदींनी म्हटले.
मी भारतात येताच लवकरात लवकर तुमचे दर्शन घेऊ इच्छित होतो. तुम्हाला सॅल्यूट करू इच्छित होतो. तुमच्या कष्टाला सॅल्यूट आहे, असे म्हणताना पंतप्रधान नरेंद्र मोदी भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. यावेळी, मोदींच्या डोळ्यात अश्रू तरळल्याचंही दिसून आलं. यावेळी मोदींनी इस्रोतील सर्वच शास्त्रज्ञांना सॅल्यूट करत, तुमच्या कष्टाला, तुमच्या धैर्याला, तुमच्या सातत्याला आणि तुमच्या इच्छाशक्तीला माझा सलाम असल्याचं मोदींनी म्हटलं.
PM Shri @narendramodi got emotional while speaking to ISRO scientists. #Chandrayaan3pic.twitter.com/cTIiw55hAK
— BJP (@BJP4India) August 26, 2023
२३ ऑगस्ट राष्ट्रीय अंतराळ दिवस
२३ ऑगस्ट रोजी चंद्रयानाने चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वी लँडिंग केलं आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा दिवस (२३ ऑगस्ट) राष्ट्रीय अंतराळ दिवस (National Space Day) म्हणून साजरा करण्याची मोठी घोषणा केली. २३ ऑगस्ट रोजी भारताने चंद्रावर तिरंगा फडकावला, तो दिवस भारत राष्ट्रीय अंतराळ दिवस म्हणून साजरा करेल, हा दिवस आपल्याला नेहमीच प्रेरणा देत राहील, असेही मोदींनी म्हटले.