व्हिडिओ व्हायरल : ‘जामिया’त पोलिसांचा लाठीमार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2020 06:27 AM2020-02-17T06:27:19+5:302020-02-17T06:27:47+5:30
१५ डिसेंबरच्या कारवाईचे सीसीटीव्ही चित्रीकरण आले समोर : दिल्ली पोलिसांची बदनामी; सर्वच स्तरांतून जोरदार टीका
पोलीस शत्रू नव्हेत मित्र, त्यांचा आदर करा; अमित शहा यांचे आवाहन
नवी दिल्ली : दिल्लीत दोन महिन्यांपूर्वी जामिया मिलिया विद्यापीठात झालेल्या हिंसाचाराच्या वेळी पोलीस तेथील ग्रंथालयात घुसून अभ्यास करीत बसलेल्या विद्यार्थ्यांना दंडुक्यांनी बेदम मारत असल्याचा नवा व्हिडिओ रविवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला असतानाच, पोलीस हे शत्रू नव्हेत, तर मित्र असल्याने लोकांनी त्यांचा आदर करावा, असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी येथे केले. देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांचा सल्ला लक्षात घेऊन हिंसक प्रसंग शांतपणे हाताळण्याचा सल्लाही त्यांनी पोलिसांना दिला.
दिल्ली पोलीस दलाच्या ७३ व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित समारंभात शहा म्हणाले की, पोलीस जातपात किंवा धर्माचा कोणताही विचार न करता देशात शांतता व सुरक्षा राखण्याचे काम करीत असतात. यादृष्टीने पोलीस हे जनतेचे शत्रू नव्हेत, तर मित्र असल्याने त्यांचा आदर केला जायला हवा.
शहा असेही म्हणाले की, वर्षभर नागरिक पोलिसांच्या सतर्कतेमुळे सर्व सण-वार आनंदात व शांततेत साजरे करू शकतात; पण स्वत: पोलिसांना मात्र कोणतेही सण साजरे करता येत नाहीत. सरदार पटेलांनी दिल्ली पोलिसांची स्थापना केली होती व या पोलीस दलाने पटेल यांच्या अपेक्षा बव्हंशी पूर्ण केल्या आहेत, असे सांगून गृहमंत्री पुढे म्हणाले की, दिल्ली पोलिसांच्या सदैव सतर्कतेमुळे राजधानीच्या या शहरात अनेक मोठे कार्यक्रम आयोजित करणे शक्य होते. यामुळेच दिल्ली पोलीस जगातील सर्वोत्तम पोलीस दलांत गणले जातात.
पोलिसांचे बलिदान विसरून चालणार नाही
च्गृहमंत्री म्हणाले की, पोलिसांवर प्रसंगी टीका होते. त्याला माझा आक्षेप नाही. तीही ऐकायला मी तयार आहे; पण स्वातंत्र्यापासून आतापर्यंत ३५ हजारांहून अधिक पोलिसांनी देशासाठी प्राणांची आहुती दिली आहे, हेही विसरून चालणार नाही.
च्सन १९९१ पासून कर्तव्य बजावत असताना बलिदान दिलेल्या दिल्ली पोलीस दलातील ३० शिपायांना त्यांनी आदरांजली वाहिली.