Video: शरद पवारांना खरंच पाचव्या रांगेचा पास होता?... जाणून घ्या सत्य
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2019 08:16 PM2019-06-04T20:16:08+5:302019-06-04T20:16:24+5:30
शरद पवार यांना राष्ट्रपती भवनाकडून पाठवण्यात आलेला पास V रांगेचा होता.
नवी दिल्ली - राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा, माजी केंद्रीय मंत्री आणि देशाच्या राजकारणातील मुरब्बी नेते शरद पवार हे ३० मे रोजी पंतप्रधाननरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याला अनुपस्थित राहिले होते. राजधानी दिल्लीत जाऊनही त्यांनी शपथविधी सोहळ्याकडे पाठ फिरवल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. तेव्हा, शरद पवार यांना पाचव्या रांगेचा पास दिला गेल्यानं ते शपथविधी सोहळ्याला गेले नाहीत, असा दावा करण्यात येत होता. मोदी सरकारने पवारांचा अपमान केला, महाराष्ट्राचा अवमान केला, अशा प्रतिक्रियाही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सोशल मीडियावर व्यक्त करत होते. परंतु, या दाव्यात काही तथ्य नसल्याचं समोर आलं आहे.
शरद पवार यांना राष्ट्रपती भवनाकडून पाठवण्यात आलेला पास V रांगेचा होता. हा V म्हणजे रोमनमधील पाच असल्याचा पवारांचा समज झाला असावा किंवा नंतर तसं वातावरण निर्माण करण्यात आलं असावं. कारण, हा V म्हणजे VVIP मधील V होता, असं राष्ट्रपती भवनातील विश्वसनीय सूत्रांनी सांगितलं आहे. पीआयबीवर (प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो) उपलब्ध असलेला व्हिडीओ पाहिला, तरी V ही पहिली रांग असल्याचं स्पष्ट होतं. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, यूपीएच्या नेत्या सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, मुलायम सिंह, गुलाम नबी आझाद, राष्ट्रवादीचे नेते शंकरसिंह वाघेला ही सर्व नेतेमंडळी या V रांगेतच बसल्याचं पाहायला मिळतं.
शपथविधी सोहळ्याच्या पासेसचे V, V1, V2, V3 असे भाग करण्यात आले होते. त्यापैकी V ही रांग अतिमहत्त्वाच्या पाहुण्यांसाठी होती.
दरम्यान, नरेंद्र मोदींच्या शपथविधीच्या दिवशी म्हणजेच ३० मे रोजी शरद पवार दिल्लीत होते. राहुल गांधी आणि त्यांची भेटही झाली होती. परंतु, संध्याकाळी ते राज्यात परतले होते. ते शपथविधीला का गेले नाहीत, याबद्दल स्वतः पवारांनी किंवा राष्ट्रवादीच्या नेत्याने अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.