Video - दिल्लीकरांच्या घशाला कोरड! टँकर येताच पाण्यासाठी झुंबड; भीषण होतंय जलसंकट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2024 11:41 AM2024-05-31T11:41:54+5:302024-05-31T11:50:35+5:30

Delhi Water Crisis : देशाच्या राजधानीत उष्णतेसोबतच पाण्याचीही मोठी समस्या निर्माण झाली आहे. दिल्लीतील अनेक भागात भीषण पाणीटंचाई आहे.

Video water crisis in delhi becoming frightening people rush to tanker for water in many areas | Video - दिल्लीकरांच्या घशाला कोरड! टँकर येताच पाण्यासाठी झुंबड; भीषण होतंय जलसंकट

Video - दिल्लीकरांच्या घशाला कोरड! टँकर येताच पाण्यासाठी झुंबड; भीषण होतंय जलसंकट

उत्तर आणि मध्य भारतातील अनेक भागात उष्णतेचा प्रकोप पाहायला मिळत आहेत. कमाल तापमानाचे वर्षानुवर्षे जुने रेकॉर्ड मोडीत निघाले असून अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे. याच दरम्यान देशाच्या राजधानीत उष्णतेसोबतच पाण्याचीही मोठी समस्या निर्माण झाली आहे. दिल्लीतील अनेक भागात भीषण पाणीटंचाई आहे.

अनेक भागात लोक बादल्या आणि पाईप घेऊन पाण्याच्या टँकरच्या मागे धावताना दिसतात. पाण्याचा टँकर पाहताच लोकांची मोठी झुंबड उडते, असे अनेक व्हिडीओ समोर आले आहेत. लोक लांबच लांब रांगेत पाण्यासाठी उभे आहेत. हे संकट इतके मोठं आहे की, दिल्ली सरकारला गुरुवारी तातडीची बैठक बोलावावी लागली. तसेच  पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांवर यापूर्वीच दंड आकारण्यात आला आहे.

उष्माघाताच्या रुग्णांसाठी आरएमएल रुग्णालयात विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. न्यूज एजन्सी एएनआयने गीता कॉलनीचा एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्यामध्ये लोकांचा मोठा जमाव एका पाईपमधून पाणी भरण्यासाठी धडपडताना दिसत आहे.

"आम्ही पाणी विकत घेऊन पितो"

जलसंकटाबद्दल बोलताना कॉलनीतील रहिवासी म्हणाले, ही खूप मोठी समस्या आहे. एक टँकर येतो आणि वस्ती खूप मोठी आहे. एवढ्या मोठ्या वस्तीचं एका टँकरमध्ये काय होणार? शासनाकडे दोन वेळा अर्ज दिले मात्र गरिबांसाठी कोणतीही सुनावणी होत नाही. आम्ही पाणी विकत घेऊन पितो आणि अनेक वेळा पाणी भरताना लोकांना दुखापत झाल्याचं त्यांनी सांगितलं.

असेच दृश्य दिल्लीतील विवेकानंद कॅम्पमध्ये पाहायला मिळत आहे जिथे लोकांना पाणी भरण्यासाठी अनेक तास लांब रांगेत उभे राहावे लागते. येथील पाण्यामुळे लोकांमध्ये वाद, मारामारी हे आता रोजचं झालं आहे. सकाळी सहा वाजल्यापासून येथील लोक पाण्याच्या टँकरची वाट पाहत असतात.

रात्रीच पाण्यासाठी लागते मोठी रांग 

दिल्लीतील वसंत विहार येथील कुसुमपूर टेकडीवर रणरणत्या उन्हातही लोक रांगेत उभे आहेत. पाण्याची समस्या विशेषतः महिलांना अधिक सतावत आहे. बहुतेक घरातील पुरुष आणि मुले कामावर जातात, अशा परिस्थितीत पाणी भरण्याची जबाबदारी घरातील महिलांवर असते. काही ठिकाणी तर रात्रीच लोक पाण्यासाठी रांगेत उभे आहेत.

केजरीवाल यांनी भाजपाकडे मागितली मदत 

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी जलसंकटावर सांगितलं की, "यावेळी संपूर्ण देशात अभूतपूर्व उष्णता असून त्यामुळे देशभरात पाणी आणि विजेचे संकट आहे. अशा कडक उन्हात पाण्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे."

"दिल्लीला शेजारील राज्यांतून मिळणारे पाणीही कमी झालं आहे. म्हणजे मागणी खूप वाढली आणि पुरवठा कमी झाला. हे सर्वांनी मिळून हा प्रश्न सोडवायचं आहे. भाजपाचे मित्र आमचा विरोध करत असल्याचं मला दिसत आहे. यामुळे प्रश्न सुटणार नाही."

"जर भाजपाने हरियाणा आणि यूपीच्या सरकारशी चर्चा केली आणि दिल्लीला महिनाभर पाणी दिले तर दिल्लीतील लोक भाजपाच्या या कृतीचं खूप कौतुक करतील. एवढी प्रचंड उष्णता कोणाच्याही नियंत्रणाबाहेर आहे. मात्र आपण सर्वांनी एकत्र येऊन काम केल्यास जनतेला दिलासा मिळू शकतो."


 

Web Title: Video water crisis in delhi becoming frightening people rush to tanker for water in many areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.