हॉस्टेलमध्ये व्हिडीओकांड; मुलीनेच शूट केले, व्हिडीओ; चौकशीचे दिले आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2022 08:34 AM2022-09-19T08:34:10+5:302022-09-19T08:35:05+5:30
चंडीगड विद्यापीठातील अनेक मुलींचे स्नान करतानाचे व्हिडीओ व्हायरल
बलवंत तक्षक
चंडीगड: पंजाबच्या मोहालीतील चंडीगड विद्यापीठाच्या वसतिगृहातील मुलींचे स्नान करतानाचे व्हिडीओ बनवून व्हायरल केल्याप्रकरणी एका विद्यार्थिनीला पोलिसांनी अटक केली. ती एमबीए प्रथम वर्षाची विद्यार्थिनी आहे. तिने हे व्हिडीओ तिच्या शिमला येथील मित्राला पाठवले होते. ते त्याने सोशल मीडियावरव्हायरल केले. मित्राला पकडण्यासाठी पोलिसांचे एक पथक शिमल्याला रवाना झाले आहे.
मुख्यमंत्री भगवंत मान यांनी याबाबत उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. पोलीस अधीक्षक विवेकशील सोनी यांनी या घटनेमुळे धक्का बसून एका विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याचे वृत्त फेटाळून लावले. संशय आला असता मुलींनी तिला रंगेहाथ पकडले आणि याची माहिती विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांना दिली. ६० हून अधिक मुलींचे व्हिडीओ तिने शूट केल्याचे समजते. चौकशीनंतर मुलीने मित्राच्या सांगण्यावरून आपण हे करत होतो, असे सांगितले.
‘गंभीर आणि लज्जास्पद’
n दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ही घटना अत्यंत गंभीर व लज्जास्पद असल्याचे सांगितले. यात सहभागी सर्व दोषींना कठोर शिक्षा दिली जाईल, असे ते म्हणाले.
n या प्रकरणात एक आठवड्याच्या आत सत्य समोर येईल. आरोपींवर कडक कारवाई केली जाईल, असे पंजाब राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष मनीषा गुलाटी यांनी सांगितले.
n राष्ट्रीय महिला आयोगाने दखल घेत, गुन्हेगारांवर तत्काळ एफआयआर दाखल करा, असे पत्र आयोगाच्या अध्यक्ष रेखा शर्मा यांनी पोलीस महासंचालकांना पाठवले आहे.
विद्यार्थ्यांची घोषणाबाजी
विद्यापीठात सध्या तणाव निर्माण झाला असून, निदर्शने व घोषणाबाजीदरम्यान एका विद्यार्थिनीला हृदयविकाराचा झटका आला तर अन्य अनेक विद्यार्थिनींची प्रकृती बिघडली. विद्यापीठात कोणीही सुरक्षित नाही, असे आंदोलक विद्यार्थ्यांनी सांगितले.
आरोपी मुलीने शिमल्यातील मित्राला जो व्हिडीओ पाठवला तो तिचा स्वत:चा आहे. तिच्या मित्राला अटक केल्यानंतर दोघांना समोरासमोर बसवून चौकशी केली जाईल. न्यायवैद्यक विभागाचे लोक तिच्या मोबाइलची तपासणी करत आहेत, असे अतिरिक्त पोलीस महासंचालक गुरप्रीत देओ यांनी सांगितले.