राजकुमारी दिया कुमारींची 'जादू' कायम; खासदार असताना लढवताहेत आमदारकीची निवडणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2023 11:52 AM2023-12-03T11:52:29+5:302023-12-03T11:54:53+5:30
Rajasthan Election Result 2023 : 2013 मध्ये सवाईमाधोपूरमधून आमदार झालेल्या दिया कुमारी या सध्या राजसमंदच्या खासदार आहेत आणि यावेळी त्यांना आमदारकीचं तिकीटही मिळालं आहे.
राजस्थान निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली आहे. या निवडणुकांमध्ये कोण जिंकले आणि कोणाला पराभवाला सामोरे जावे लागले हे आज ठरणार आहे. पण राजस्थानमध्ये अशा काही जागा आहेत ज्याकडे लोकांचं लक्ष लागलं आहे. यापैकी एक जागा जयपूरची विद्याधर नगर आहे. भाजपाने येथून खासदार दिया कुमारी यांना उमेदवारी दिली आहे. त्याचवेळी यांच्या विरोधात काँग्रेसने सीताराम अग्रवाल यांना तिकीट दिलं आहे. आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार दिया कुमारी आघाडीवर आहेत.
2013 मध्ये सवाईमाधोपूरमधून आमदार झालेल्या दिया कुमारी या सध्या राजसमंदच्या खासदार आहेत आणि यावेळी त्यांना आमदारकीचं तिकीटही मिळालं आहे. जयपूरच्या राजकुमारी दिया कुमारी महाराजा सवाई सिंह आणि राणी पद्मिनी देवी यांची कन्या आहेत. जयपूर शहरातील ही जागा भाजपाचा बालेकिल्ला मानली जाते. दिया कुमारींसाठी विद्याधर नगर ही सोपी जागा मानली जाते. भाजपाचे नरपत सिंह राजवी यांनी तिन्ही निवडणुका जिंकल्या आहेत. दिया कुमारी यांना हवामहल मतदारसंघातून निवडणूक लढवायची होती.
जयपूरच्या माजी राजघराण्यातील महाराजा सवाई भवानी सिंह आणि पद्मिनी देवी यांची एकुलती एक मुलगी दिया कुमारी यांचा जन्म 30 जानेवारी 1971 रोजी राजघराण्यात झाला होता. दिया कुमारी यांनी शालेय शिक्षणानंतर लंडनमध्ये डेकोरेटिव्ह आर्ट्सचा कोर्स केला. त्यांचा राजकीय प्रवास अतिशय नेत्रदीपक राहिला आहे. 2013 मध्ये भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर त्यांनी त्याच वर्षी सवाई माधोपूरमधून विधानसभेची निवडणूक लढवली आणि आमदार झाल्या. यानंतर 2019 मध्ये राजसमंद मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवली आणि खासदार बनल्या.
दिया कुमारी सध्या राजस्थान भाजपाच्या महिला मोर्चाच्या प्रदेश प्रभारी आहेत. राजकारणाव्यतिरिक्त त्या स्वतःची एनजीओही चालवतात. यासोबतच त्यांना शाळा आणि हॉटेल व्यवसायातही विशेष रस आहे. सध्या जयपूरमधील भाजपाचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विद्याधर नगर मतदारसंघातून पक्षाने त्यांना उमेदवारी दिली आहे. भविष्यात राज्याच्या मुख्यमंत्री म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे.