अवघ्या पाच मिनिटांत पाकिस्तानचा बुरखा फाडणारी कोण आहे 'ती'?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2019 11:35 AM2019-10-01T11:35:16+5:302019-10-01T11:35:49+5:30
काश्मीरवरुन थयथयाट करणाऱ्या पाकिस्तानला संयुक्त राष्ट्रात सुनावले खडे बोल
नवी दिल्ली: संयुक्त राष्ट्राच्या महासभेत पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या भाषणाला भारताकडून सडेतोड प्रत्युत्तर देण्यात आलं. परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रधान सचिव विदिशा मैत्रा यांनी अवघ्या पाच मिनिटांत संयुक्त राष्ट्रात पाकिस्तानचा बुरखा टराटरा फाडला. संयुक्त राष्ट्रात प्रत्येक देशाला स्वत:ची बाजू मांडण्याचा अधिकार असतो. मात्र इम्रान खान यांच्या भाषणाच्या रुपात पहिल्यांदाच एखाद्या देशानं या अधिकाराचा इतका मोठ्या प्रमाणात दुरुपयोग पाहिला असेल, अशा शब्दांमध्ये मैत्रा यांना पाकिस्तानवर शाब्दिक हल्ला चढवला.
संयुक्त राष्ट्रात काश्मीर राग आळवणाऱ्या इम्रान खान यांना विदिशा मैत्रा यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. 'भारतावर टीका करताना पाकिस्तानकडून विध्वंस, रक्तरंजित, बंदूक उचलू, शेवटपर्यंत लढू अशा शब्दांचा वापर करण्यात आला. या सर्व शब्दांमधून पाकिस्तानच्या नेतृत्त्वाचा दृष्टीकोन दिसतो. त्यांची मानसिकता मध्ययुगीन आहे. २१ व्या शतकातला दृष्टीकोन त्यांच्या विधानांमध्ये कुठेही दिसत नाही,' अशा शब्दांमध्ये मैत्रा पाकिस्तानवर बरसल्या.
काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यावरुन पाकिस्ताननं संयुक्त राष्ट्रातही थयथयाट केला. 'कलम ३७० मुळे जम्मू-काश्मीरच्या विकासाला बाधा येत होती. मात्र त्यावर पाकिस्ताननं दिलेल्या प्रतिक्रियेतून त्यांच्या मनातला द्वेष दिसतो. शांतता निर्माण करण्यात पाकिस्तानला काडीमात्र रस नाही. त्यांना केवळ युद्धातच स्वारस्य आहे. त्यांच्या विधानांवरुन हेच स्पष्ट होतं,' असं म्हणत मैत्रा यांनी पाकिस्तानचे वाभाडे काढले.
विदिशा मैत्रा भारतीय परराष्ट्र सेवेच्या २००९ बॅचच्या अधिकारी आहेत. त्या २००८ मध्ये लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्या. या परीक्षेत मैत्रा देशात ३९ व्या आल्या होत्या. २००९ मध्ये त्यांचं प्रशिक्षण पूर्ण झालं. त्यामध्ये त्यांना बेस्ट ट्रेनिंग ऑफिसर म्हणून सुवर्णपदक मिळालं. त्या सध्या संयुक्त राष्ट्रात भारताच्या प्रधान सचिव म्हणून काम करतात. संयुक्त राष्ट्रातील त्या भारताच्या सर्वात नव्या अधिकारी आहेत.