Coronavirus : दक्षता मात्रेने संसर्गतीव्रता कमी होणार, डॉ. बलराम भार्गव यांचे मत
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2021 08:00 AM2021-12-31T08:00:40+5:302021-12-31T08:01:04+5:30
Coronavirus : डिसेंबर २०१९ च्या कालावधीत दररोज एक हजार टन ऑक्सिजनचा पुरवठा होत असे. यंदाच्या मे महिन्यात हे प्रमाण ९६०० टन झाले आहे म्हणजे सुमारे दहापट वाढ झाली आहे.
- नितीन अग्रवाल
नवी दिल्ली : कोरोना लसीकरणानंतर निर्माण झालेली प्रतिकारशक्ती नऊ महिने किंवा त्याहून अधिक कालावधीपर्यंत टिकून राहील, असे इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचे महासंचालक डॉ. बलराम भार्गव यांनी सांगितले. ते म्हणाले की, आरोग्यसेवकांसह अन्य कोरोनायोद्धे तसेच एकाहून अधिक व्याधी असलेल्या ६० वर्षे वयावरील ज्येष्ठ नागरिकांना दक्षता मात्रा (प्रिकाॅशनरी डोस) दिल्याने संसर्गाची तीव्रता कमी होणार आहे.
दक्षता मात्रेने प्रकृती चिंताजनक होण्याचे व मृत्यू यांचे प्रमाणही घटणार असल्याचे त्यांनी सांगितले. ओमायक्रॉन विषाणूमुळे कोरोनाचा झपाट्याने प्रसार होत आहे. कोरोना रुग्णांच्या उपचारांसाठी आवश्यक असलेल्या ऑक्सिजनचा पुरवठा व साठा यांच्या स्थितीबाबत केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी गुरुवारी एका बैठकीत आढावा घेतला. ऑक्सिजन टंचाई ओमायक्रॉनच्या संसर्गकाळात उद्भवू नये म्हणून केंद्र सरकार उपाययोजना करत आहे. डिसेंबर २०१९ च्या कालावधीत दररोज एक हजार टन ऑक्सिजनचा पुरवठा होत असे. यंदाच्या मे महिन्यात हे प्रमाण ९६०० टन झाले आहे म्हणजे सुमारे दहापट वाढ झाली आहे.
डेल्टाविरोधात लढण्याची मिळणार ताकद
ओमायक्रॉनची बाधा झाल्यानंतर शरीरात निर्माण होणाऱ्या अँटीबॉडीज त्या व्यक्तीला डेल्टा विषाणूविरोधात लढण्याचीही प्रतिकारशक्ती देतात असे दक्षिण आफ्रिकेतील एका अभ्यासात आढळून आले आहे. जगभरात ओमायक्रॉन संसर्गाबाबत झपाट्याने डेल्टाची जागा घेत आहे. तो डेल्टापेक्षा कमी घातक असल्याचे शास्त्रज्ञांचे मत असले तरी ओमायक्रॉनची संसर्गशक्ती मोठी आहे. त्यामुळेच हा विषाणू जागतिक आरोग्य व्यवस्थेसमोर आव्हान उभे करू शकतो.