काेराेना लस सर्वदूर पाेहाेचविण्यासाठी जोरदार तयारी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2020 06:10 AM2020-11-23T06:10:41+5:302020-11-23T06:11:26+5:30
केंद्राने माॅडर्ना, फायझर, सीरम इंस्टिट्यूट, भारत बायाेटेक आणि झायडस कॅडिला यांना लसीसाठी संपर्क केला आहे. या कंपन्यांच्या लसींना आतापर्यंतच्या चाचण्यांमध्ये ९० ते ९५ टक्के यश मिळाले आहे.
नवी दिल्ली : जगभरात थैमान घालणाऱ्या काेरानाचा संसर्ग राेखण्यासाठी लस पुढील वर्षी उपलब्ध हाेईल. नंतर खरे आव्हान असेल ते प्रत्येक घटकापर्यंत ती पाेहाेचविण्याचे. यादृष्टीने हालचाली सुरू झाल्या असून प्रमुख विमानतळांवर परिवहन व्यवस्था तसेच आवश्यक तापमान नियंत्रण झाेन उपलब्ध करुन देण्याची तयारी करण्यात येत आहे. कमी वेळेत जास्तीत जास्त कार्गाे विमानांचे संचलन करण्यासाठी कार्गाे कंपन्यांनी तयारी केली आहे.
केंद्राने माॅडर्ना, फायझर, सीरम इंस्टिट्यूट, भारत बायाेटेक आणि झायडस कॅडिला यांना लसीसाठी संपर्क केला आहे. या कंपन्यांच्या लसींना आतापर्यंतच्या चाचण्यांमध्ये ९० ते ९५ टक्के यश मिळाले आहे. देशात औषधांच्या आयातीसाठी मुंबई हे सर्वात माेठे प्रवेशद्वार आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय विमानतळावर काेराेना लसीची ने-आण करणाऱ्या विमानांना उड्डाणासाठी गरजेनुसार प्राधान्याने स्लाॅट उपलब्ध करण्यात येईल, असे विमानतळावरील एका प्रवक्त्याने सांगितले. दिल्लीतील विमानतळावर २ कार्गाे टर्मिनल आहेत. तसेच उणे २० अंश सेल्सिअस एवढ्या कमी तापमानाची साठवणूक यंत्रणा आहे.
काेराेनाविरुद्धच्या लढणाऱ्यांसाठी एक गुड न्यूज आहे. भारत बायाेटेककडून विकसित करण्यात येत असलेली ‘काेव्हॅक्सीन’ लस ६० टक्के प्रभावी ठरल्याचा दावा कंपनीने केला आहे. अशा प्रकारची काेणतीही लस ५० टक्के प्रभावी ठरत असल्यास तिला मंजूरी मिळू शकते.
काेव्हॅक्सीनचा प्रभाव ६० टक्क्यांहून जास्तही असू शकताे, असे कंपनीचे अध्यक्ष साई डी. प्रसाद म्हणाले. लस पुढील वर्षी दुसऱ्या तिमाहीत उपलब्ध हाेऊ शकते, असेही ते म्हणाले.
या शहरांत साठवणुकीची सोय
काही कंपन्यांकडे मुंबई, चेन्नई, हैदराबाद, दिल्ली, काेलकाता, पुणे, अहमदाबाद आणि बंगळुरू या प्रमुख विमानतळांवर फार्मा ग्रेड कंडिशनिंग कक्ष आहे. या ठिकाणी कमी तापमानात लस साठविण्याची साेय आहे. त्यामुळे मागणीनुसार झटपट लस पाेहाेचविणे शक्य हाेईल.
ग्रामीण भागात खरे आव्हान
‘सेंटर फाॅर सेल्युलर अॲण्ड माॅलिक्यूलर बायाेलाॅजी’चे संचालक डाॅ. राकेश मिश्रा यांनी सांगितले, की देशात माेठ्या प्रमाणात लसीचे उत्पादन तसेच वितरणाचे खरे आव्हान आहे. शहरी भागात साठवणुकीसाठी अडचणी कमी राहतील. मात्र, ग्रामीण भागात उणे ७० अंश सेल्सिअसपर्यंत तापमानाची साेय करणे अवघड ठरू शकते.