विजय दर्डा यांनी घेतली अर्थमंत्र्यांची भेट; देशाच्या वित्तीय व्यवस्थापनाची केली प्रशंसा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2022 05:55 AM2022-05-18T05:55:46+5:302022-05-18T05:56:49+5:30
दोन वर्षांपूर्वीच्या आत्मनिर्भर भारत उपक्रमाला आता फळे येत आहेत, त्याबद्दल विजय दर्डा यांनी भेटीदरम्यान अर्थमंत्र्यांचे अभिनंदन केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली:लोकमत वृत्तपत्र समूहाच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन व राज्यसभेचे माजी सदस्य विजय दर्डा यांनी मंगळवारी वित्त व कॉर्पोरेट व्यवहारमंत्री निर्मला सीतारामन यांची नॉर्थ ब्लॉकमधील त्यांच्या कार्यालयात भेट घेतली.
दर्डा यांनी अर्थमंत्र्यांना पुणे येथे लोकमत सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित केले. ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक व लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक जवाहरलाल दर्डा यांच्या स्मृत्यर्थ १०० रुपयांचे नाणे प्रसिद्ध केल्याबद्दल त्यांनी अर्थमंत्र्यांचे आभार मानले.
दोन वर्षांपूर्वीच्या आत्मनिर्भर भारत उपक्रमाला आता फळे येत आहेत, त्याबद्दल दर्डा यांनी भेटीदरम्यान अर्थमंत्र्यांचे अभिनंदन केले. भारत आता उत्पादनाचे प्रमुख आंतरराष्ट्रीय केंद्र बनले आहे व जागतिक कंपन्या दुकाने उभारण्यासाठी बीलाईन बनवित आहेत.
विशेषत: रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर तेलाच्या किमतीचे व्यवस्थापन, जागतिक घटकांमुळे वाढलेली अन्नधान्य महागाई या मुद्द्यांवरही या भेटीत चर्चा झाली. ही आव्हाने पेलल्याबद्दल आणि अनेक विकसित देशांच्या तुलनेत जीडीपीचा वेग अधिक चांगला ठेवल्याबद्दल दर्डा यांनी अर्थमंत्र्यांचे अभिनंदन केले. महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ समर्थित भंडारा जिल्ह्यातील कारागिरांनी खास विणलेली साडीही दर्डा यांनी अर्थमंत्र्यांना भेट दिली.