विजय दर्डा यांनी घेतली उपराष्ट्रपती धनखड यांची भेट, 2 पुस्तकेही दिली गिफ्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2022 09:19 AM2022-09-21T09:19:01+5:302022-09-21T09:19:53+5:30
विविध विषयांवर चर्चा; यवतमाळला येण्याचे दिले निमंत्रण
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : लोकमत वृत्तपत्र समूहाच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन आणि माजी राज्यसभा सदस्य विजय दर्डा यांनी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची सोमवारी संध्याकाळी येथे उपराष्ट्रपती भवनात भेट घेतली.
उपराष्ट्रपतिपदी निवड झाल्याबद्दल विजय दर्डा यांनी त्यांचे अभिनंदन केले. त्यांची चर्चा जवळपास अर्धा तास चालली. यावेळी त्यांनी विविध विषयांवर संवाद साधला. महाराष्ट्राचे प्रथम क्रमांकाचे वृत्तपत्र असलेल्या आणि देशातील आघाडीच्या भाषिक वृत्तपत्रांपैकी एक असलेल्या लोकमत माध्यम समूहाची उपराष्ट्रपतींनी सविस्तरपणे चौकशी केली. विजय दर्डा यांनी याबाबत उपराष्ट्रपतींना माहिती दिली की, हा वृत्तपत्र समूह हिंदी (लोकमत समाचार) आणि इंग्रजी (लोकमत टाइम्स) वृत्तपत्र प्रकाशित करतो. न्यूज १८ समूहाच्या सहकार्याने आणि मराठी भाषेतील टीव्ही न्यूज चॅनेलच्या साथीने लोकमतचे डिजिटल क्षेत्रातील पाऊलही अतिशय यशस्वी झालेले आहे. उपराष्ट्रपती हे राजस्थानचे आहेत आणि दर्डा यांचे पूर्वज हे त्याच राज्यातील आहेत. त्यामुळे उभयतांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. आदल्या दिवशी दर्डा यांनी माजी परराष्ट्र मंत्री के. नटवर सिंग यांचीही भेट घेतली आणि त्यांच्याशी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. यावेळी दर्डा यांनी के. नटवर सिंग यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि त्यांची दोन पुस्तके ‘रिंगसाइड’ आणि ‘पब्लिक इश्यू बिफोर पार्लमेंट’ ही त्यांना भेट दिली.
उपराष्ट्रपतींना दोन पुस्तके दिली भेट
nयावेळी दर्डा यांनी उपराष्ट्रपती धनखड यांना नवीन पुस्तक ‘रिंगसाइड : अप, क्लोज अँड पर्सनल ऑन इंडिया अँड बियाँन्ड’ आणि ‘पब्लिक इश्यू बिफोर पार्लमेंट’ ही दोन पुस्तके भेट दिली आणि त्यांच्याशी कायद्याच्या संबंधित मुद्द्यावर चर्चा केली. उपराष्ट्रपती धनखड हे उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाचे प्रसिद्ध वकील होते हे येथे नमूद करणे उचित आहे.
nयावेळी विजय दर्डा यांनी त्यांचे वडील आणि लोकमत मीडिया समूहाचे संस्थापक ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी जवाहरलाल दर्डा यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यानिमित्त त्यांचा संगमरवरी अर्धपुतळा उपराष्ट्रपतींना भेट दिला. महाराष्ट्रातील त्यांचे मूळ गाव यवतमाळ येथे येण्याचे निमंत्रण यावेळी दर्डा यांनी उपराष्ट्रपतींना दिले.