विजय मल्ल्याने सहा हजार कोटींच्या कर्जातील मोठा हिस्सा फिरवला बनावट कंपन्यांमध्ये
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2017 10:39 AM2017-09-25T10:39:40+5:302017-09-25T10:53:20+5:30
बँकांची हजारो कोटी रुपयांची कर्ज बुडवलेला आणि लंडनमध्ये पळालेल्या उद्योगपती विजय मल्ल्याच्या अडचणीत आणखीन वाढ होणार आहे.
नवी दिल्ली- बँकांची हजारो कोटी रुपयांची कर्ज बुडवून लंडनमध्ये पळालेल्या उद्योगपती विजय मल्ल्याच्या अडचणीत आणखीन वाढ होणार आहे. दिवाळखोरीत गेलेल्या किंगफिशर एअरलाइन्स कंपनीचा डोलारा सांभाळण्यासाठी बँकांकडून घेतलेल्या सहा हजार कोटींच्या कर्जातील मोठा हिस्सा त्याने सात देशांमधील बनावट कंपन्यांमध्ये फिरविल्याचं समोर आलं आहे. सीबीआय आणि ईडीच्या चौकशीत ही बाब समोर आली आहे. सीबीआय आणि ईडीकडून लवकरच मल्ल्यावर एक नवं आरोपपत्र दाखल केलं जाणार आहे. याआधी माल्ल्याने आयडीबीआयकडून घेतलेल्या ९०० कोटींच्या कर्जाप्रकरणी त्याच्याविरोधात पहिले आरोपपत्र दाखल करण्यात आलं. आता तब्बल ६ हजार कोटींच्या कर्ज प्रकरणात त्याच्याविरोधात आरोपपत्र दाखल केलं जाणार आहे. मल्ल्याच्या प्रत्यार्पण प्रक्रियेत या आरोपपत्रांची मोठी मदत भारताला होऊ शकते. मल्ल्याच्या प्रत्यार्पण प्रकरणी ब्रिटनच्या वेस्टमिन्स्टर न्यायालयात सध्या खटला सुरु आहे. बँकाकडून घेतलेलं कर्ज मल्ल्याने युके, युएस, आयर्लंड आणि फ्रान्समधील बनावट कंपन्यामध्ये वळविल्याची माहिती सुत्रांकडून मिळते आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे.
बँकांनी किंगफिशर एअरलाइन्सला जे कर्ज दिलं ते मल्ल्या आणि त्याच्या सहकाऱ्यांनी बनवाट कंपन्यांना पाठवल्याचं तपासातून समोर आलं आहे.आम्ही अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स आणि आयर्लंडसोबत यासंदर्भात पत्रव्यवहार करत आहोत, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.
मल्ल्याने घेतलेल्या 6027 कोटींच्या कर्जामधील नेमका किती पैसा त्याने बनावट कंपन्यांमध्ये फिरवला याबद्दलची स्पष्ट माहिती अधिकाऱ्यांनी दिली नाही. पण ही रक्कम मोठी असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. विजय मल्ल्याने बँकांनी किंगफिशर एअरलाइन्सला जे कर्ज दिलं ते मल्ल्या आणि त्याच्या सहकाऱ्यांनी बनावट कंपन्यांना पाठवलं अशी माहिती आम्हाला मिळाली होती. आम्ही अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स आणि आयर्लंडसोबत यासंदर्भात पत्रव्यवहार करत आहोत, यासंबंधी लवकरच सविस्तर माहिती आम्हाला मिळेल, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. विजय मल्ल्याने एकुण 17 बॅंकांकडून 6,027 कोटी रुपयांचं कर्ज घेतलं, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं. यापैकी एसबीआयकडून त्याने सर्वाधीक कर्ज घेतलं आहे. विजय मल्ल्याने केलेल्या या मनी लॉड्रिंग प्रकरणी सविस्तर माहिती असलेलं नवं चार्ज शीटने मल्ल्याच्या विरोधातील खटल्याला अधिक बळकटी येइल, असंही अधिकाऱ्यांनी सांगितलं.
कर्ज बुडवून परदेशात पळालेल्या विजय मल्ल्याने आयडीबीआय बँकेतून घेतलेल्या कर्जाचा अर्धा हिस्सा अनेक बनावटी कंपन्या तयार करून त्यामध्ये गुंतविला. या बनावटी कंपन्यांमध्ये मल्ल्याच्या काही पर्सनल स्टाफ तसंच निवृत्त अधिकाऱ्यांना डायरेक्टर करण्यात आलं. सीबीआय एका महिन्यात मनी लॉन्ड्रिंगची केस दाखल करणार असून त्यामध्ये मल्ल्याने केलेल्या घोटाळ्यांची माहिती दिली जाणार आहे.
मल्ल्याने १७ भारतीय बँकांकडून ६,०२७ कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. यापैकी एसबीआयकडून सर्वाधिक १६०० कोटी रुपये, पंजाब नॅशनल बँक ८०० कोटी, बँक ऑफ इंडिया ६५० कोटी, बँक ऑफ बडोदा ५५० कोटी, सेंट्रल बँक ऑफ इंडिया ४१० कोटी, युको बँक ३२० कोटी, कॉर्पोरेशन बँक ३१० कोटी, स्टेट बँक ऑफ म्हैसूर १५० कोटी, इंडियन ओव्हरसीज बँक १४० कोटी रुपयांचं कर्ज मल्ल्याने घेतलं आहे.