विजय मल्ल्या ‘फरार’ घोषित
By admin | Published: June 15, 2016 04:20 AM2016-06-15T04:20:10+5:302016-06-15T04:20:10+5:30
मद्यसम्राट विजय मल्ल्या याला मंगळवारी विशेष पीएमएलए (प्रिव्हेन्शन आॅफ मनी लॉड्रींग अॅक्ट) न्यायालयाने फौजदारी दंडसंहिता कलम ८२ अंतर्गत ‘फरारी’ जाहिर केले. त्यामुळे मल्ल्याला आता
मुंबई: मद्यसम्राट विजय मल्ल्या याला मंगळवारी विशेष पीएमएलए (प्रिव्हेन्शन आॅफ मनी लॉड्रींग अॅक्ट) न्यायालयाने फौजदारी दंडसंहिता कलम ८२ अंतर्गत ‘फरारी’ जाहिर केले. त्यामुळे मल्ल्याला आता ३० दिवसांत पीएलएमए न्यायालयात हजर राहावे लागेल.
ज्या व्यक्तीविरुद्ध अटक वॉरंट काढले आहे, ती व्यक्ती फरारी आहे किंवा तपास यंत्रणेपासून लपत आहे. त्यामुळे तपास यंत्रणेला वॉरंटवर अंमल करता येत नाही, असे न्यायालयाला वाटले तर न्यायालय संबंधित व्यक्तीला फरारी जाहिर करू शकते. आयडीबीआय बँकेचे कर्ज बुडवल्याप्रकरणाचा तपास अंमलबजावणी संचालनालय (ईडी) करत आहे. अटक वॉरंट जारी करूनही मल्ल्या हातात येत नसल्याने ईडीने ११ जून रोजी मल्ल्याला फरारी घोषित करण्यासाठी विशेष न्यायालयात अर्ज केला. या अर्जावर मंगळवारी निर्णय देत न्यायालयाला विजय मल्ल्याला फरारी घोषित केले. ‘मल्ल्याला भारतात परत आणण्यासाठी आम्ही ही खटाटोप करत आहोत. वॉरंट जारी करूनही तो आला नाही. न्यायालयाने त्याला फरारी घोषीत केल्याने आमची केस आणखी मजबूत झाली आहे. तसेच मल्ल्याची येथील मालमत्ता जप्त करण्याचा आमचा मार्ग मोकळा झाला आहे,’ असे ईडीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. सुनावणीत ईडीचे वकील हितेन वेणेगावकर यांनी न्यायालयाला सांगितले की, मल्ल्या प्रसारमाध्यमांना माहिती देत आहे. याचाच अर्थ त्याला अजामिनपात्र वॉरंटची माहिती आहे. (प्रतिनिधी)
मल्ल्याविरुद्ध अनेक तपास यंत्रणांनी अटक वाँरट काढले आहे. तसेच पीएलएमएअंतर्गत अजामिनपात्र अटक वाँरटही काढण्यात आले आहे. ईडीच्या म्हणण्यानुसार, मल्ल्याने आयडीबीआयकडून किंगफिशरसाठी ९५० कोटींचे कर्ज घेतले.
मात्र त्यातील ४५० कोटी रुपये भारतातबाहेर संपत्ती विकत घेण्यासाठी वापरले. शनिवारीच ईडीने मल्ल्याची मुंबई, बंगळुरु, कुर्ग आणि चेन्नई येथील १,४११ कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली.