विजय माल्ल्या यांना दुहेरी दणका; कर्ज बुडविणे भोवले

By admin | Published: March 8, 2016 02:32 AM2016-03-08T02:32:14+5:302016-03-08T02:32:14+5:30

आता बंद झालेली किंगफिशर एअरलाइन्स आणि युनायटेड स्पिरिट्स या आघाडीच्या मद्यनिर्मिती कंपनीच्या नावे सार्वजनिक बँकांकडून हजारो कोटी रुपयांची कर्जे घेऊन ती चुकती न करण्यामुळे

Vijay Mallya gets double bump; Debt bounces | विजय माल्ल्या यांना दुहेरी दणका; कर्ज बुडविणे भोवले

विजय माल्ल्या यांना दुहेरी दणका; कर्ज बुडविणे भोवले

Next

बेंगळुरु/ मुंबई : आता बंद झालेली किंगफिशर एअरलाइन्स आणि युनायटेड स्पिरिट्स या आघाडीच्या मद्यनिर्मिती कंपनीच्या नावे सार्वजनिक बँकांकडून हजारो कोटी रुपयांची कर्जे घेऊन ती चुकती न करण्यामुळे उद्योगपती विजय माल्ल्या यांना सोमवारी स्वतंत्र प्रकरणांत दोन दणके मिळाले. गेल्या महिन्यात लंडनमधील दिएगो उद्योगसमुहासोबत झालेल्या समझोत्यानुसार माल्ल्यांना मिळणार असलेल्या ७५ दशलक्ष डॉलरच्या (सुमारे ५१५ कोटी रुपये) रकमेवर बेंगळुरु येथील कर्ज वसुली न्यायाधिकरणाने तात्पुरती टाच आणली. तर दुसरीकडे आयडीबीआय बँकेचे सुमारे ९०० कोटी रुपयांचे कर्ज बुजविल्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) माल्ल्या यांच्याविरुद्ध ‘मनी लॉड्रिंग’चा खटला दाखल केला.
स्टेट बँक आॅफ इंडियासह १७ सार्वजनिक बँकांनी मिळून माल्ल्या यांच्या किंगफिशर एअरलाइन्सला दिलेले ७,८०० कोटी रुपयांचे कर्ज जानेवारी २०१२ पासून थकित आहे. माल्ल्या यांना ‘कर्जबुडवे’ म्हणून जाहीर केल्यानंतर या कर्जाच्या वसुलीसाठी स्टेट बँकेने गेल्या महिन्यात दावाही दाखल केला होता.
माल्ल्या यांची युनायटेड स्पिरिट््स ही कंपनी आता ब्रिटनच्या दिएगो उद्योगसमुहाने घेतली आहे. त्यासंदर्भात दिएगोसोबत झालेल्या समझोत्यानुसार माल्ल्या यांनी युनायटेड स्पिरिट््स कंपनीच्या चेअरमन पदावरून पायउतार व्हायचे व त्याबदल्यात दिएगोने त्यांना ७५ दशलक्ष डॉलर द्यायचे असे ठरले होते. आमच्या बुडित कर्जाचे प्रकरण मिटेपर्यंत माल्ल्यांना दिएगोकडून ही रक्कम मिळणे रोखावे, असा अर्ज स्टेट बँकेने केला होता. त्यावर कर्ज वसुली न्यायाधिकरणाने मल्ल्यांना पैसे देण्यास दिएगोला तात्पुरती मनाई केली व पुढील सुनावणी २८ मार्च रोजी ठेवली. दुसऱ्या प्रकरणात आयडीबीआय बँकेकडून घेतलेले ९०० कोटी रुपयांचे कर्ज बुडविल्याच्या संदर्भात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मद्यसम्राट विजय माल्या आणि इतरांविरुद्ध मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे.
सीबीआयने गेल्या वर्षी कर्ज थकविल्याच्या आरोपात एफआयआर दाखल केला होता. आता त्याच एफआयआरच्या आधारावर ईडीने माल्या व इतरांविरुद्ध मनी लाँडरिंग प्रतिबंधात्मक कायद्याअंतर्गत
नुकताच गुन्हा दाखल केला, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली. ईडीच्या मुंबईतील क्षेत्रीय कार्यालयाने हा गुन्हा दाखल केलेला असला तरी सीबीआयचे अधिकारी बंद पडलेल्या किंगफिशर एअरलाईन्सच्या
आर्थिक संरचनेचा तपास करीत आहेत आणि विदेश चलन कायद्याचे उल्लंघन केल्याच्या संदर्भातही
स्वतंत्र चौकशी केली जाण्याची शक्यता आहे, असे या सूत्रांनी सांगितले. (वृत्तसंस्था)
> चौकशीसाठी बोलावणार
‘माल्या आणि अन्य लोकांना लवकरच चौकशीसाठी बोलावण्यात येईल. तपास संस्थेने संबंधित अधिकारी आणि बँकेकडून आवश्यक ते दस्तऐवज गोळा केलेले आहेत,’ असेही या सूत्रांनी स्पष्ट केले. याआधी सीबीआयने किंगफिशर एअरलाईन्सचे संचालक विजय माल्या, कंपनीचे मुख्य वित्तीय अधिकारी ए. रघुनाथन आणि आयडीबीआयच्या अज्ञात अधिकाऱ्यांविरुद्ध एफआयआर दाखल केला होता. कर्ज मर्यादेबाबतचे सर्व नियम धाब्यावर बसवून किंगफिशर एयरलाईन्सला कर्ज मंजूर करण्यात आल्याचा आरोप या एफआयआरमध्ये करण्यात आला आहे.

Web Title: Vijay Mallya gets double bump; Debt bounces

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.