विजय मल्ल्या यांनी ६,०२७ कोटींच्या कर्जाचा मोठा हिस्सा पाठविला विदेशात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2017 12:09 AM2017-09-26T00:09:09+5:302017-09-26T00:11:17+5:30
ब्रिटनला पळून गेलेले कुख्यात उद्योगपती विजय मल्ल्या यांनी किंगफिशर एअर लाइन्ससाठी घेतलेल्या ६,०२७ कोटी रुपयांच्या कर्जाचा मोठा हिस्सा बनावट कंपन्यांच्या माध्यमातून (सेल कंपन्या) विविध सात देशांत पाठविला असल्याची माहिती आहे.
नवी दिल्ली : ब्रिटनला पळून गेलेले कुख्यात उद्योगपती विजय मल्ल्या यांनी किंगफिशर एअर लाइन्ससाठी घेतलेल्या ६,०२७ कोटी रुपयांच्या कर्जाचा मोठा हिस्सा बनावट कंपन्यांच्या माध्यमातून (सेल कंपन्या) विविध सात देशांत पाठविला असल्याची माहिती आहे. या माहितीच्या आधारे आता त्यांना भारतात परत आणण्याची तयारी सीबीआय आणि अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) चालविली आहे.
६१ वर्षीय मल्ल्या यांच्या मालकीच्या किंगफिशर एअर लाइन्सकडे आयडीबीआय बँक आणि अन्य भारतीय बँकांचे ९ हजार कोटींपेक्षा जास्त कर्ज थकले आहे. त्यासाठी त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई सुरू आहे. तथापि, या कारवाईतून वाचण्यासाठी मल्ल्या ब्रिटनला पळून गेले आहेत.
सूत्रांनी सांगितले की, स्टेट बँक आॅफ इंडियाच्या नेतृत्वाखालील बँक समूहाकडून घेतलेल्या कर्जाचा पैसा मल्ल्या यांनी बनावट कंपन्यांच्या माध्यमातून सात देशांत पाठविला आहे. अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स आणि आयर्लंड या देशांचा त्यात समावेश आहे. या प्रकरणाच्या तपासाशी संबंधित एका वरिष्ठ अधिका-याने सांगितले की, बनावट कंपन्या आणि सात देशांतील बँक खात्यांचा संबंध आम्ही हुडकून काढण्यात यश मिळविले आहे. यासंबंधी अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स आणि आयर्लंड या देशांना पत्रे पाठविण्यात आली आहेत. त्यातून तपास अधिका-यांना यासंबंधीचा आणखी तपशील मिळणार आहे.