मल्ल्या, मोदी, चोक्सीने बुडवलेली 40 टक्के रक्कम बॅंकांना परत; जप्त संपत्तीतून दिली भरपाई
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2021 06:51 AM2021-06-24T06:51:26+5:302021-06-24T06:54:54+5:30
बँकांचा एनपीए होणार कमी; जप्त संपत्तीतून दिली भरपाई
नवी दिल्ली : बँकांकडून कर्जे घेऊन परदेशात पसार झालेले उद्योगपती विजय मल्ल्या, प्रसिद्ध हिरे व्यापारी नीरव मोदी आणि त्याचा मामा मेहुल चोक्सी यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या संपत्तीपैकी ९०४१.५ कोटी रुपये कर्ज देणाऱ्या बँकांना परत करण्यात आले आहेत. यामुळे बँकांच्या बुडालेल्या २२ हजार कोटी रुपयांपैकी सुमारे ४० टक्के रक्कम परत मिळाली आहे.
अंमलबजावणी संचालनालयाने या तीनही उद्योगपतींची १८,१७०.०२ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. यापैकी ९०४१.५ कोटींची मालमत्ता बँकांकडे हस्तांतरित केली. मल्ल्याच्या युनायटेड ब्रेवरिज लि. कंपनीचे ५८२४.५० कोटी रुपये मूल्याचे शेअर्स विकण्याला कर्ज वसुली संचालनालयाने बुधवारी स्टेट बँकेला परवानगी दिली. याआधीच या कंपनीचे वर्ग केलेले शेअर्स व आताचे शेअर्स मिळून ६६२४ कोटींचे शेअर्स ईडीने स्टेट बँकेकडे वर्ग केले. बँकांनी यापूर्वीच मल्ल्याच्या कंपनीचे शेअर्स विकून १३७५ कोटी वसूल केले आहेत.
बँकांकडून कर्ज घेऊन परदेशात पसार झालेल्या या त्रिकुटाने केलेल्या गैरव्यवहारांची चौकशी अंमलबजावणी संचालनालय, तसेच सीबीआयकडून केली जात आहे. पंजाब नॅशनल बँकेला हिरे व्यापारी नीरव मोदी व त्याचा मामा मेहुल चोक्सी यांनी फसविले असून, ती रक्कम १३ हजार कोटी रुपये असल्याचे चौकशीत पुढे आले आहे.
मद्यसम्राट अशी ओळख सांगणाऱ्या विजय मल्ल्या आणि त्याच्या किंगफिशर एअर लाइन्सने केलेला घोटाळा ९ हजार कोटी रुपयांचा आहे. अशा प्रकारे या त्रिकुटाने केलेल्या घोटाळ्यांची रक्कम २२,५८५.८३ कोटी रुपये आहे. चौकशीमध्ये या तिघांनीही बनावट व्यक्ती व संस्था दाखवून पैशांचा गैरव्यवहार केल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात मनी लँड्रिंगचे गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत.
नीरव मोदीची याचिका फेटाळली
भारतामध्ये प्रत्यार्पण करण्याला विरोध करणारी नीरव मोदीची याचिका इंग्लंडच्या उच्च न्यायालयाने फेटाळून लावली असून, त्याविरोधात अपील दाखल करणाऱ्याला पाच दिवसांची मुदत दिली आहे. पंजाब नॅसनल बँकेमधील घोटाळ्याप्रकरणी नीरव मोदी याला भारतामध्ये परत पाठविण्याला ब्रिटनचे परराष्ट्र मंत्री प्रीती पटेल यांनी १६ एप्रिल रोजी परवानगी दिली होती. या विरोधात नीरव मोदीने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, त्याने सादर केलेल्या पुराव्यांमध्ये काहीच अर्थ नसल्याचे सांगत न्यायमूर्तींनी त्याची याचिका फेटाळली आहे. १९ मार्च २०१९ रोजी त्याला अटक करण्यात आली असून, तेव्हापासून तो लंडनच्या तुरुंगातच आहे.
याचिका फेटाळली
याआधीच अन्य बँकांनी नीरव मोदीकडून १०६० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. त्यामुळे या त्रिकुटाकडून बँकांना मिळालेली रक्कम ही ९०४१.५ कोटी रुपयांची असल्याचे ईडीने जाहीर केले आहे. या तीनही उद्योगपतींमुळे बँकांना झालेल्या एकूण तोट्यापैकी ४० टक्के रक्कम ही आतापर्यंत वसूल झाली असल्याचा दावाही ईडीतर्फे करण्यात आला आहे.