अटकेनंतर काही तासांतच विजय माल्याची सुटका

By Admin | Published: April 18, 2017 03:35 PM2017-04-18T15:35:04+5:302017-04-18T17:52:25+5:30

किंगफिशर एअरलाइन्सच्या विजय माल्याला लंडनमध्ये अटक करण्यात आली. मात्र काही तासांतच त्याला जामीन मंजूर

Vijay Mallya's release in few hours after the arrest | अटकेनंतर काही तासांतच विजय माल्याची सुटका

अटकेनंतर काही तासांतच विजय माल्याची सुटका

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत

लंडन, दि. 18 - हजारो कोटींच्या थकीत कर्जप्रकरणी भारताला हव्या असलेल्या  किंगफिशर एअरलाइन्सच्या विजय माल्याला लंडनमध्ये अटक करण्यात आली. मात्र त्याला लंडन येथील वेस्टमिंस्टर न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याची जामिनावर मुक्तता केली. माल्याकडे भारतातील विविध बँकांचे सुमारे 9 हजार कोटींचे कर्ज थकित आहे. तसेच त्याच्यावर आर्थिक गैरव्यवहारासह अनेक गंभीर स्वरूपाचे आर्थिक गुन्हे दाखल झालेले आहेत.  

माल्याला आज स्कॉटलंड यार्ड पोलिसांकडून अटक केली. अटकेची कारवाई झाल्यानंतर त्याच्या भारताकडे हस्तांतरण करण्यास चालना मिळेल, असा अंदाज वर्तवण्यात येत होता. पण माल्याला वेस्टमिंस्टर मॅजिस्ट्रेट कोर्टात हजर करण्यात आले असता तेथे कोर्टाने त्याला जामीन मंजूर केला. त्यानंतर  "माझ्या अटकेचे भारतातील प्रसारमाध्यमांनी अवास्तव वृत्तांकन केले. प्रत्यार्पणाच्या खटल्याची आज सुनावणी सुरू झाली आहे," असे ट्विट करत माल्याने प्रसारमाध्यमांवर टीका केली.  

माल्याच्या प्रत्यार्पणासाठी परराष्ट्र मंत्रालयाने 9 फेब्रुवारी रोजी ब्रिटिश सरकारला प्रस्ताव पाठवला होता. "माल्याच्या प्रत्यार्पणासाठी सीबीआयकडून आलेला प्रस्ताव ब्रिटिश सरकारकडे सोपवण्यात आला आहे. माल्याविरोधात भारतात खटला चालवण्यासाठी त्याला भारताकडे सोपवण्यात यावे", अशी मागणी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरुप यांनी केली होती.

विजय माल्याची बुडीत निघालेली कंपनी किंगफिशर एअरलाइन्सकडे नऊ हजार कोटींचे कर्ज थकले होते. एसबीआयच्या नेतृत्वाखालील 17 विविध बँकांनी माल्याला हे कर्ज दिले होते. कंपनी डबघाईस येऊन कर्जाची परतफेड करणे अशक्य झाल्यावर माल्या इंग्लंडमध्ये पसार झाला होता. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने माल्याला पासपोर्टसह न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र माल्या न्यायालयात हजर राहिला नव्हता.

( विजय माल्याच्या "किंगफिशर व्हिला"ची अखेर विक्री)  

भारताने केली होती प्रत्यार्पणाची मागणी 
दरम्यान, यावर्षी फेब्रुबारी महिन्यात भारत-ब्रिटन प्रत्यार्पण करारांतर्गत माल्याला भारताच्या ताब्यात देण्याची मागणी भारताने ब्रिटनकडे  केली होती. त्यासाठी  वित्तमंत्री अरुण जेटली यांनी ब्रिटन दौरा करून तेथील संबंधितांशी चर्चा केली होती. 

( कर्ज नाही मदत मागितली होती, विजय माल्याच्या उलट्या बोंबा )

 सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला होता माल्याचा पासपोर्ट
बँकांचे जवळपास 9000 कोटी रुपयांचे कर्ज बुडवून विजय माल्या देशाबाहेर पसार झाला होता. यानंतर माल्याची देशवापसी करण्यासाठी केंद्र सरकारने बरेच प्रयत्न केले. विजय माल्याचा पासपोर्ट सरकारकडून रद्द करण्यात आला होता.  तीनवेळा समन्स बजावूनही विजय माल्या हजर न झाल्यामुळे सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) दिल्लीतील प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाला त्यांचा पासपोर्ट रद्द किंवा हस्तगत करावा, असे कळवले.  माल्यावर मायदेशी परतण्याचा दबाव निर्माण करण्यासाठी ही कारवाई करण्यात आली होती.  
 
( विजय माल्याकडे आहेत फक्त 16,440 रुपये )
 
 
 न्यायालयाने केले होते विजय माल्याला फरार घोषित
मुंबईतील विशेष न्यायालयाने माल्याला फरार म्हणून घोषित केले होते. अंमलबजावणी संचालनालयाने न्यायालयाकडे मागणी केल्यानंतर न्यायालयाने हा निर्णय दिला होता.  
विजय मल्ल्यांविरोधात सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) कारवाईला सुरुवात करत आयडीबीयच्या  900 कोटीं कर्ज घोटाळ्यासंबंधी तपास करत असलेल्या ईडीने त्याची 1411 कोटींची मालत्ता जप्त केली.  माल्या आपल्या मालमत्तेची विक्री सुरू केल्याची कुणकुण ईडीला लागताच तातडीने जप्तीची कारवाई करण्यात आली.
 

Web Title: Vijay Mallya's release in few hours after the arrest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.