विजय रूपाणी पुन्हा गुजरातचे मुख्यमंत्री; हिमाचलात भाजपाचा गोंधळ, धुमल-ठाकूर रस्सीखेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2017 04:25 AM2017-12-23T04:25:19+5:302017-12-23T04:25:51+5:30
गुजरातच्या मुख्यमंत्रिपदी विजय रूपाणी व उपमुख्यमंत्री नितीन पटेल हेच असतील, असे शुक्रवारी स्पष्ट झाले. भाजपा विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत नेते म्हणून रूपाणी व उपनेते म्हणून नितीन पटेल यांची निवड झाल्याची घोषणा पक्षाचे निरीक्षक अरुण जेटली यांनी केली.
गांधीनगर/सिमला : गुजरातच्या मुख्यमंत्रिपदी विजय रूपाणी व उपमुख्यमंत्री नितीन पटेल हेच असतील, असे शुक्रवारी स्पष्ट झाले. भाजपा विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत नेते म्हणून रूपाणी व उपनेते म्हणून नितीन पटेल यांची निवड झाल्याची घोषणा पक्षाचे निरीक्षक अरुण जेटली यांनी केली.
जेटली म्हणाले की, बैठकीत आम्ही अन्य कोणी इच्छुक आहेत का, वा कोणाला इतर नावे सुचवायची आहेत का, याची विचारणा केली होती, पण या दोघांनाच सर्वांचा पाठिंबा असल्याचे आढळून आहे. भाजपा गुजरातमध्ये सलग सहाव्यांदा सरकार स्थापन करणार आहे. मात्र, यंदा १८२ जणांच्या विधानसभेत भाजपाचे ९९ आमदारच असतील. हिमाचल प्रदेशात मात्र भाजपा विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत इतका गोंधळ झाला की, त्यात नवे मुख्यमंत्री ठरवताच आले नाहीत. पराभूत झालेले व माजी मुख्यमंत्री प्रेमकुमार धुमल यांच्या समर्थकांनी हा गोंधळ घातला. पराभूत झाल्याने त्यांची निवड होण्याची शक्यता कमी असली, तरी त्यांचा प्रयत्न सुरू आहे.
तिथे निरीक्षक म्हणून गेलेल्या संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासमोरच हा सारा प्रकार घडला. त्यामुळे मुख्यमंत्रिपदाचा निर्णय दिल्लीत होईल, असे सांगून त्या तेथून बाहेर पडल्या. या गोंधळाविषयी पक्षाध्यक्ष अमित शहा यांना काही पत्रकारांनी विचारले असता, ‘आमच्या पक्षामध्ये लोकशाही आहे,’ एवढेच उत्तर त्यांनी दिले. दुसरीकडे भाजपाचे नेते व माजी मुख्यमंत्री शांता कुमार यांनी या गोंधळास धुमल जबाबदार असल्याची टीका केली. ते म्हणाले की, पराभूत धुमल मुख्यमंत्री होऊ शकत नाहीत. त्यांच्या समर्थकांनी घातलेला गोंधळ अयोग्य होता. (वृत्तसंस्था)
निर्णय अनिश्चित-
चार वेळा विजयी झालेले जयराम ठाकूर व आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा हेही मुख्यमंत्रिपदासाठी इच्छुक आहेत. जयराम ठाकूर यांनाच पक्षश्रेष्ठी मुख्यमंत्री करतील, अशी शक्यता आहे. आजच्या बैठकीत प्रेमकुमार धुमल व ठाकूर यांच्या समर्थकांनी एकमेकांविरोधात घोषणा दिल्या, तसेच धुमल समर्थक आमदारांनी नड्डा व ठाकूर यांच्या नावाला बैठकीत विरोध केला. त्यामुळे निर्णय कधी होणार, हे सांगणे अवघड आहे.