Vijay Rupani Resigns: मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा का दिला? लिहून आणलेलं उत्तर विजय रुपाणींनी वाचून दाखवलं, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2021 04:08 PM2021-09-11T16:08:40+5:302021-09-11T16:10:08+5:30
Vijay Rupani Resigns: गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा का दिला यामागचं कारण विजय रुपाणी यांनी स्पष्ट केलं आहे.
Vijay Rupani Resigns: गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी आज मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. राजीनामा दिल्यानंतर त्यांनी यामागचं कारण देखील स्पष्ट केलं. यासाठी ते एक पत्रकच घेऊन आले होते. लिहून आणलेली माहिती त्यांनी वाचून दाखवली. "गुजरातच्या विकास यात्रेत मला योगदान देण्याची संधी मिळाली. मला दिलेल्या जबाबदारीबाबत मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार व्यक्त करतो", असं विजय रुपाणी म्हणाले.
गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा!
राजीनामा दिल्यानंतर रुपाणी यांनी प्रसारमाध्यमांसमोर त्यांनी लिहून आणलेली नोंद वाचून दाखवली. ते म्हणाले, "भाजपानं मला गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाची अतिशय महत्त्वाची जबाबदारी दिली. त्याचं मी अतिशय चांगल्या पद्धतीनं पालन केलं. याकाळात मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं विशेष मार्गदर्शन मिळालं. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मार्गदर्शनाखाली गुजरातनं सर्वांगीण विकास तसंच समाज कल्याणाच्या मार्गावर नवं शिखर गाठलं आहे. गुजरातच्या या विकास कार्यात मला योगदान देता आलं त्याबद्दल मी पंतप्रधान मोदींचे आभार व्यक्त करतो"
गुजरातची विकास यात्रा नव्या ऊर्जेसह सुरू राहील
"गुजरातची विकास यात्रा यापुढेही पंतप्रधान मोदींच्या नेतृत्त्वात एका नव्या उत्साह आणि ऊर्जेसह पुढे सुरू राहावी असं मला वाटतं. यासाठीच मुख्यमंत्रिपदाचा मी राजीनामा दिला आहे. भाजपा हा एक संघटना आणि विचारधारांवर चालणारा असल्यामुळे कालानुरुप संघटनेत कार्यकर्त्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये बदल होत असतात अशी भाजपाची परंपरा आहे. जी जबाबदारी दिली जाते ती योग्य पद्धतीनं पार पाडण्याचं काम पक्षातील प्रत्येक कार्यकर्ता करतो हे भाजपाचं वैशिष्ट्य आहे. पक्षाकडून राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी पार पाडल्यानंतर आता पक्ष संघटनेत नवी ऊर्जा निर्माण करण्यासाठी काम करण्याची इच्छा मी व्यक्त केली आहे", असंही रुपाणी यांनी म्हटलं आहे.