विजय रुपानी गुजरातचे नवे मुख्यमंत्री
By admin | Published: August 7, 2016 12:43 PM2016-08-07T12:43:23+5:302016-08-07T13:05:22+5:30
भाजपच्या विजय रुपानी यांनी गुजरातचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.
Next
ऑनलाइन लोकमत
सूरत, दि. ७ - भाजपच्या विजय रुपानी यांनी गुजरातचे नवे मुख्यमंत्री म्हणून रविवारी शपथ घेतली. राज्यपाल ओ.पी.कोहली यांनी रुपानी आणि उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. गांधीनगरमध्ये झालेल्या या कार्यक्रमाला भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी, पक्षाध्यक्ष अमित शहा, केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली आणि भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित आहेत.
मुख्यमंत्रीपदासाठी सुरुवातीपासून चर्चेत राहिलेले नितीन पटेल यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. विजय रुपानी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा यांचे निकटवर्तीय असून, विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात. गुजरातच्या माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांनी नितीन पटेल यांच्या पारडयात आपले वजन टाकले होते.
शुक्रवारी नव्या मुख्यमंत्र्याची निवड करताना आनंदीबेन आणि अमित शहा यांच्यात वादावादी झाल्याचेही वृत्त होते. अखेर अमित शहा यांच्या भक्कम पाठिंब्यामुळे विजय रुपानी यांच्या नावावर मुख्यमंत्री म्हणून शिक्कामोर्तब करण्यात आले.
आनंदीबेन यांच्या तुलनेत विजय रुपानी चांगले पक्षसंघटक म्हणून ओळखले जातात. रुपानी पुढच्यावर्षी होणा-या गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षसंघटना आणि सरकार यांच्यामध्ये योग्य समन्वय साधू शकतील असा भाजप नेतृत्वाला विश्वास आहे.
गुजरातमधील सर्वात प्रभावशाली पटेल समाजाचे आरक्षणासाठी आंदोलन सुरु आहे. दलितांना झालेली मारहाण आणि गुजरात भाजपमधील उफाळून आलेले मतभेद या पार्श्वभूमीवर विजय रुपानी मुख्यमंत्रीपदाची खुर्ची संभाळत आहेत. निवडणुकीला फार कालावधी नसताना सत्ता टिकवण्याचे खडतर आव्हान रुपानी यांच्यासमोर आहे.
कोण आहेत विजय रुपानी
गुजरातच्या मुख्यमंत्रिपदी निवड झालेले विजय रूपानी हे भाजपा आणि संघ यांच्यातील दुवा असून, येत्या पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांचे नेतृत्व आता त्यांच्याकडे येणार आहे. रुपानी आनंदीबेन पटेल मंत्रिमंडळात वाहतूक, पाणीपुरवठा, कामगार तसेच रोजगार खात्यांचे मंत्री होते. ब्रह्मदेशात जन्म झालेले रूपानी हे गुजरातमध्ये अनेक वर्षे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे काम करीत होते.
त्यांनी १९७१ साली भारतीय जनसंघाच्या कामाला सुरुवात केली. रूपानी हे ६0 वर्षांचे असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विश्वासातील नेते म्हणून ते ओळखले जातात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपा यांच्यातील दुवा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे. विशेषत: पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी भाजपाला ते गरजेचे वाटू लागले आहे. ते १९९६ साली राजकोटचे महापौर होते. पुढे २00६ ते २0१२ या काळात ते राज्यसभेवर निवडून गेले होते.
मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना रूपानी हे राज्य वित्त मंडळाचे अध्यक्ष होते. ते जैन समाजाचे असून, सध्या गुजरातमध्ये पाटीदार आणि दलित समाज भाजपावर नाराज असताना, भाजपाने मुख्यमंत्री म्हणून त्यांची निवड करून, तटस्थ नेतृत्व देण्याचा प्रयत्न केला आहे.
Gandhinagar: Vijay Rupani sworn in as the Chief Minister of Gujarat pic.twitter.com/Nea8lLcbtl
— ANI (@ANI_news) August 7, 2016