गुजरातमध्ये विजय रुपानीचं मुख्यमंत्रिपदी कायम राहणार ?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2017 04:21 PM2017-12-22T16:21:18+5:302017-12-22T16:24:03+5:30
प्रेम कुमार धुमल यांच्या पराभवामुळे हिमाचल प्रदेशमध्ये भाजपासमोर मुख्यमंत्रिपदाचा पेच निर्माण झालेला असला तरी, गुजरातमध्ये नेतृत्वबदल होण्याची शक्यता धुसर आहे.
अहमदाबाद - प्रेम कुमार धुमल यांच्या पराभवामुळे हिमाचल प्रदेशमध्ये भाजपासमोर मुख्यमंत्रिपदाचा पेच निर्माण झालेला असला तरी, गुजरातमध्ये नेतृत्वबदल होण्याची शक्यता धुसर आहे. विजय रुपानीच गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी कायम रहातील असे फायनान्शिअल एक्स्प्रेसने म्हटले आहे. गुजरातमध्ये भाजपाने सलग सहाव्यांदा सत्ता मिळवली आहे. पण या निवडणुकीत भाजपाचे मताधिक्क्य आणि जागा ब-यापैकी घटल्या आहेत.
150 जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवणा-या भाजपाला फक्त 99 जागांवर समाधान मानावे लागले. 2012 मध्ये भाजपाने गुजरातमध्ये 115 जागा जिंकल्या होत्या. यावेळी काँग्रेसच्या जागांमध्ये मोठी वाढ झाली. 2012 मध्ये 61 जागा जिंकणारी काँग्रेस 77 जागांपर्यंत पोहोचली. पटेल मतदारांची नाराजी आणि आणखी दीडवर्षांनी 2019 मध्ये होणारी लोकसभेची निवडणूक लक्षात घेता मोदींसारखी जनमानसाची पकड घेणा-या नेत्याची आज गुजरात भाजपाला आवश्यकता आहे.
लोकसभा निवडणुकीला सामोरे जाताना गुजरातमध्ये घटलेला जनाधार भाजपाला परवडणारा नाही. भाजपाने यंदाची गुजरात विधानसभेची निवडणूक विजय रुपानी आणि उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांच्या नेतृत्वाखाली लढवली. दोन दिवसांपूर्वी गुजरातच्या मुख्यमंत्रीपदीसाठी अचानक स्मृती इराणी यांचे नाव चर्चेत आले होते. स्मृती इराणी गुजरातच्या पुढच्या मुख्यमंत्री बनू शकतात अशा बातम्या प्रसारमाध्यमांनी चालवल्या होत्या. पण स्मृती इराणी यांनी हे वृत्त फेटाळून लावले.
गल्लीतीली निवडणूक असेल तर माझे नाव तुम्ही ऐकाल. संसदीय समिती याबद्दल निर्णय घेईल. मी कुठल्याही स्पर्धेत नाही असे इराणी यांनी स्पष्ट केले. गुजरातमध्ये सत्ता स्थापनेत भाजपाकडून उत्तर प्रदेशचे सूत्र अंमलात आणले जाऊ शकते. रुपानी यांना मुख्यमंत्रिपदी कायम ठेऊन दोन उपमुख्यमंत्री नेमले जाऊ शकतात. उत्तर प्रदेशमध्ये भाजपाने योगीआदित्यनाथ यांना मुख्यमंत्री बनवून दोन उपमुख्यमंत्री नियुक्त केले आहेत.