विजयन यांच्या टू टर्म पॉलिसीने ‘संधी’ साधली, मुख्यमंत्री पदाच्या मार्गातील अडथळे दूर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2021 01:51 AM2021-03-15T01:51:27+5:302021-03-15T01:51:37+5:30
सलग दोनवेळा विधानसभा निवडणुकीत जिंकणाऱ्यांना सीपीआयएमने उमेदवारी न देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे सीपीआयएमच्या मातब्बर पाच मंत्र्यांचे विधानसभेचे दरवाजे कायमचे बंद झाले आहेत.
पोपट पवार -
तिरुवनंतपूरम : तरुण तुर्कांना राजकारणात संधी देण्याच्या नावाखाली केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी सलग दोनवेळा निवडून आलेल्यांना विधानसभा निवडणुकीत कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाने (मार्क्सवादी) तिकीट नाकारून केरळच्या राजकारणात पहिल्यांदाच टू टर्म पॉलिसीचा मार्ग अवलंबला खरा; मात्र, विजयन यांची ही चाल मुख्यमंत्री पदाच्या मार्गातील अडथळे दूर करण्यासाठी तर नाही ना, अशी शंका आता राजकीय जाणकारांमधून व्यक्त होऊ लागली आहे. (Vijayan's two-term policy provided an 'opportunity', removing obstacles in the way of becoming the Chief Minister)
सलग दोनवेळा विधानसभा निवडणुकीत जिंकणाऱ्यांना सीपीआयएमने उमेदवारी न देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे सीपीआयएमच्या मातब्बर पाच मंत्र्यांचे विधानसभेचे दरवाजे कायमचे बंद झाले आहेत. ए. के. बालन, पी. जयराजन, जी. सुधाकरन, सी. रवींद्रनाथ, टी. एम. थॉमस आणि विधानसभा अध्यक्ष पी. श्रीरामकृष्णन् या दिग्गज नेत्यांना टू टर्म पॉलिसीचा फटका बसला आहे. हे पाचही मंत्री पिनराई विजयन यांचे पक्षांतर्गत स्पर्धक मानले जातात. त्यामुळे विजयन यांनी ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ही नवी पॉलिसी राबवत आपल्या पक्षांतर्गत विराेधकांना राजकीय स्पर्धेतून अंडरप्ले केले असल्याची चर्चा आहे.
सीपीआयएम हा सुरुवातीपासून बी. एस. अच्युतानंदन आणि पिनराई विजयन या दोन गटांमध्ये विभागला गेला. ज्या बड्या नेत्यांची उमेदवारी कापण्यात आली, ते सर्वच नेते अच्युतानंदन गटाचे असल्याने विजयन यांची टू टर्म पॉलिसीची खेळी वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. सोने तस्करीच्या प्रकरणात पिनराई विजयन यांचे नाव आल्याने नेतृत्वावरून पक्षामध्येच वादाच्या ठिणग्या पडत आहेत. विधानसभा निवडणुकीत पुन्हा डाव्यांची सत्ता आली, तर सीपीआयएम नेतृत्व मुख्यमंत्री पदासाठी विजयन यांच्या नावाबाबत फेरविचार करण्याची शक्यता आहे. त्यामुळे टू टर्म पाॅलिसीचा आधार घेत विजयन यांनी पक्षांतर्गत स्पर्धकांना दूर सारत केरळची सूत्रे पुन्हा आपल्याकडेच कशी येतील, यादृष्टीने खेळलेली ही चाल असल्याचे मानले जाते.
पाच वेळा जिंकलेले विजयन रिंगणात कसे
- सलग दोनवेळा विधानसभा निवडणूक जिंकणारे सीपीआयएमचे मातब्बर यंदा केरळच्या रणांगणातून बाहेर असले तरी, पाचवेळा विधानसभा निवडणूक जिंकणारे पिनराई विजयन पुन्हा विधानसभेच्या आखाड्यात कसे, असा प्रश्न अच्युतानंदन गटाकडून उपस्थित केला जात आहे.
- मात्र, पिनराई विजयन हे सलगपणे दोन वेळा विधानसभा निवडणूक जिंकलेले नाहीत. त्यामुळे टू टर्म पॉलिसीचा नियम त्यांना लागू होत नसल्याचा दावा त्यांचे समर्थक करत आहेत.
- पुढील २०२६ मधील विधानसभा निवडणूक मात्र, टू टर्म पॉलिसीनुसार मला लढविता येणार नाही, असे विजयन सांगत असले तरी ७५ वर्षीय विजयन पुढच्या विधानसभा निवडणुकीवेळी ८० वर्षांचे होतील. त्यामुळे त्या वयात राजकारणाचा मार्ग धुंडाळतील का, हा प्रश्नच आहे.