विकास दुबेचे दोन साथीदार एन्काऊंटरमध्ये ठार; विकासचा शोध सुरुच
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2020 08:47 AM2020-07-09T08:47:26+5:302020-07-09T08:54:13+5:30
कानपूर आणि इटावामध्ये एन्काऊंटर; विकासच्या दोन साथीदारांचा खात्मा
लखनऊ: कानपूर शूटआऊट प्रकरणातील मुख्य आरोपी विकास दुबेचे साथीदार रणबीर शुक्ला आणि प्रभात मिश्रा पोलीस एन्काऊंटरमध्ये मारले गेले आहेत. प्रभात मिश्राला पोलिसांनी फरिदाबादमधील हॉटेलमधून ताब्यात घेतलं होतं. मात्र त्यानं पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी त्याला ठार केलं. विकासचा उजवा हात मानला जाणारा अमर दुबे याआधीच चकमकीत मारला गेला आहे.
प्रभात मिश्राला पोलिसांनी बुधवारी फरिदाबादमधून अटक केली. त्याला कोर्टात हजर करण्यात आलं. यानंतर त्याला कानपूरमध्ये नेलं जात होतं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कानपूरजवळ महामार्गावर भौंतीजवळ त्यानं एसटीएफच्या पोलीस निरीक्षकाचं पिस्तुल घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी झालेल्या चकमकीत तो मारला गेला.
#UPDATE Prabhat Mishra, one of the 3 men who was arrested y'day, is dead after he was shot at by police while he tried to escape custody: UP ADG law & order Prashant Kumar. pic.twitter.com/TCmxF2d5gP
— ANI UP (@ANINewsUP) July 9, 2020
कानपूरमध्ये आठ पोलिसांची हत्या करणारा गँगस्टर विकास दुबे अजूनही फरार आहे. पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे. विविध ठिकाणी छापे टाकून विकासच्या साथीदारांना ताब्यात घेण्यात येत आहे. 'आठ पोलिसांना ठार करण्यात आलं, त्यावेळी आपण विकासच्या घरी होतो,' अशी विकासचा साथीदार असलेल्या प्रभातनं एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली. पोलिसांना मारल्याचं दु:ख असल्याचं तो पुढे म्हणाला.
Police van broke down while Prabhat Mishra was being brought to Kanpur. He took advantage of the situation,snatched pistol from policeman,fired at our men&tried to escape.Our personnel retaliated, during which Prabhat got killed.Several policemen injured in incident:ADG Kanpur https://t.co/d05i9tQggkpic.twitter.com/TfRoe4yMab
— ANI UP (@ANINewsUP) July 9, 2020
विकास दुबेचा आणखी एक साथीदार रणबीरदेखील एन्काऊंटरमध्ये ठार झाला. त्याच्यावर ५० हजारांचं बक्षीस होतं. रणबीर इटावामध्ये मारला गेला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रणबीर शुक्लानं रात्री उशिरा महेवाजवळील महामार्गावर स्विफ्ट डिझायर कारमध्ये लूटमार केली. त्याच्यासोबत आणखी तीन साथीदार होते. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी काचुरा रोडवर रणबीरला घेरलं. पोलिसांनी घेरताच चकमक सुरू झाली. यामध्ये रणबीर मारला गेला. मात्र त्याच्यासोबत असलेले तीन जण पळून गेले. यानंतर इटावा पोलिसांनी शेजारील जिल्ह्यांमध्ये अलर्ट जारी केला.