‘चांद्रयान-२’ मोहिमेतील ‘विक्रम’ लॅण्डर सुस्थितीत; संपर्क साधण्यासाठी नवी उमेद!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2019 02:30 AM2019-09-10T02:30:04+5:302019-09-10T02:30:31+5:30
इस्रोची माहिती; सुदैवाने एकसंध, पण कलंडल्याने थोड्या अडचणी
बंगळुरू : भारताच्या ‘चांद्रयान-२’ मोहिमेतील ‘विक्रम’ लॅण्डर त्याच्या कुशीतील ‘प्रज्ञान’ या रोव्हरसह चंद्राच्या दक्षिण ध्रुवाच्या प्रदेशात अपेक्षेप्रमाणे असलग न उतरता बऱ्याच उंचीवरून आदळला असला तरी त्याची मोडतोड झालेली नाही, याची खात्री पटल्याने त्याच्याशी तुटलेला संपर्क पुन्हा प्रस्थापित करण्याचे प्रयत्न भारतीय अंतराळ संशोधन संघटनेच्या (इस्रो) वैज्ञानिकांनी नव्या उमेदीने सुरू ठेवले आहेत.
सेकंदाला चार हजार किमीपेक्षा जास्त वेगाने मार्गक्रमण करणाºया ‘विक्रम’ लॅण्डरने चंद्राच्या वर ४०० किमी उंचीवर पोहोचल्यानंतर वेग झपाट्याने कमी करत अलगदपणे उतरणे अपेक्षित होते. मात्र या उतरणीतील जेमतेम दोन किमीचे अंतर शिल्लक असताना त्याचा भूनियंत्रण केंद्राशी संपर्क शनिवारी पहाटे अचानक तुटला होता. नंतर उपलब्ध माहितीचे विश्लेषण करून हा लॅण्डर चंद्रावर आदळला असावा, असा प्राथमिक निष्कर्ष ‘इस्रो’ने काढला होता. हा लॅण्डर व त्याच्या पोटात असलेल्या रोव्हरचे आयुष्य एक चांद्रदिन (पृथ्वीवरील १४ दिवस) एवढे आहे व हा कालावधी संपेपर्यंत त्याच्याशी संपर्क प्रस्थापित करण्याचे प्रयत्न सुरू ठेवले जातील, असे ‘इस्रो’चे अध्यक्ष डॉ. के. सिवान यांनी स्पष्ट केले होते.
‘विक्रम’ लॅण्डरला चंद्रापर्यंत सोबत घेऊन गेलेला ‘चांद्रयाना’तील ‘आॅर्बिटर’ हा भाग पुढील किमान एक वर्ष चंद्राभोवती १०० किमी अंतरावरून घिरट्या घालत राहून विविध वैज्ञानिक माहिती गोळा करणार आहे. त्याचे काम नियोजित पद्धतीने व्यवस्थित सुरू आहे. घिरट्या घालताना ऑर्बिटर उच्च क्षमतेच्या कॅमेºयाने चंद्राच्या पृष्ठभागाची छायाचित्रेही काढत आहे. पुढच्या फेरीमध्ये हे ऑर्बिटर जेथे लॅण्डर उतरणे अपेक्षित होते त्या जागेच्या वर पुन्हा आले तेव्हा काढलेल्या एका छायाचित्रात ‘विक्रम’ अपेक्षित जागेच्या जवळपासच चंद्रावर असल्याचे दिसले होते.
या छायाचित्रांच्या सखोल विश्लेषणानंतर या मोहिमेशी संबंधित एका वैज्ञानिकाने सोमवारी सांगितले की, अपेक्षेप्रमाणे अलगद उतरण्याऐवजी ‘विक्रम’ लॅण्डर नियोजित जागेच्या जवळच वरून आदळला असावा. तो काहीशा कलंडलेल्या स्थितीत असल्याचे दिसते. पण या आघाताने त्याची मोडतोड न होता तो एकसंघ अवस्थेत आहे, ही सुदैवाने जमेची बाजू आहे.
ऊर्जेचा अभाव नाही
ऊर्जेच्या अभावी ‘विक्रम’ निष्क्रिय झाल्याने त्याच्याशी संपर्क होत नसल्याची शक्यता वाटत नाही. कारण सौरऊर्जा तयार करण्यासाठी त्याच्या सर्व बाजूंनी सौर पॅनेल्स बसविलेली आहेत. त्यामुळे थोडा एका बाजूला झुकल्याने सौरऊर्जा निर्मिती अजिबात न होण्याची शक्यता नाही. शिवाय ‘विक्रम’मध्ये अंतर्गत बॅटºयाही असून फारसा वापर न झाल्याने त्याही अजून पूर्णपणे उतरलेल्या नसाव्यात, असेही एका वैज्ञानिकाने सांगितले.
बनावट ट्विटर खात्यांबाबत ‘इस्रो’चा सावधतेचा इशारा
‘चाद्रयान-२’ मोहिमेच्या प्रगतीविषयी कथित ताजी माहिती देणारी ‘इस्रो’ व त्यांचे अध्यक्ष डॉ. के. सिवान यांच्या नावाची अनेक बनावट टिष्ट्वटर खाती सुरु करून लाखो लोकांची दिशाभूल केली जात आहे असे लक्षात आल्यानंतर भारतीय अंतराळ संशोधन संघटनेने समाजमाध्यमांतील या तोतयेगिरीपासून सावध राहण्याचा इशारा सोमवारी दिला.
‘इस्रो’ने एका निवेदनात म्हटले की, आमचे अध्यक्ष डॉ. सिवान यांच्या छायाचित्रासह त्यांच्या नावाची खाती समाजमाध्यमांमध्ये गेले काही दिवस सक्रिय असल्याचे निदर्शनास आले आहे. डॉ. सिवान यांचे कोणत्याही समाजमाध्यमावर स्वत:चे कोणतेही व्यक्तिगत खाते नाही, असे स्पष्ट करण्यात येत आहे. त्यामुळे अशा कोणत्याही खात्यावर त्यांच्या नावे टाकली जाणारी माहिती अधिकृत नाही.
‘इस्रो’ची फेसबूक, टिष्ट्वटर व यू ट्यूब या समाजमाध्यमांत अधिकृत खाती आहेत पण ती कोणाच्याही व्यक्तिगत नावाने नाहीत. त्यामुळे या अधिकृत खात्याखेरीज अन्य कोणत्याही खात्याला ‘फॉलो’ करू नये.
संपर्काबद्दल वैज्ञानिक काय म्हणाले?
‘लॅण्डर’चा भूनियंत्रण केंद्राशी संपर्क घिरट्या घालणाºया ऑर्बिटरमार्फत होईल, अशी स्वचलित यंत्रणा त्यात आहे. पण त्यासाठी त्याचे अॅन्टेना ऑर्बिटरच्या दिशेने असणे गरजेचे आहे. आदळून तो एका बाजूला कलंडल्याने त्याचा संपर्क पुन्हा प्रस्थापित होण्याच्या शक्यता उणावल्या आहेत. शिवाय जवळपास मोठे दगड वगैरे असतील तरी त्याने संपर्कात अडथळे येऊ शकतात.