प्रेमाला 'सीमा' नाही! कॅन्टीनवाला पाकिस्तानी तरूणीच्या जाळ्यात; लष्कराची गुप्त माहिती पुरवली
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2024 12:43 PM2024-02-28T12:43:04+5:302024-02-28T12:45:13+5:30
प्रेमात कोण कोणत्या थराला जाईल याची कल्पनाही केली जाऊ शकत नाही.
प्रेमाला सीमा नसते, प्रेमात कोण कोणत्या थराला जाईल याची कल्पनाही केली जाऊ शकत नाही. याच प्रेमात वेडा झालेल्या तरूणाने पाकिस्तानातील तरूणीला गुप्त माहिती पुरवली. राजस्थानमधील बिकानेर येथील लष्करी तळावर एका पाकिस्तानी गुप्तहेराला पकडण्यात यश आले आहे. हा पाकिस्तानी गुप्तहेर दुसरा कोणी नसून लष्कराच्या कॅन्टीनचा संचालक विक्रम सिंग आहे. बिकानेरच्या महाजन आर्मी कॅन्टीनचा संचालक पाकिस्तानसाठी हेरगिरी करताना पकडला गेला. तो पाकिस्तानातील एका महिलेच्या संपर्कात होता आणि तिच्या सूचनेनुसार तो लष्कराच्या संवेदनशील ठिकाणांचे फोटो आणि कागदपत्रांचे फोटो काढून त्या महिलेला पुरवत होता.
संबंधित संचालकाचा माग काढल्यानंतर राजस्थान पोलिसांच्या गुप्तचर विभागाने त्याला अटक केली आहे. राजस्थानातील डुंगरपूरचा रहिवासी असलेला विक्रम एका पाकिस्तानी महिलेच्या संपर्कात होता. तो पाकिस्तानातील महिलेच्या सौंदर्याने आकर्षित झाला आणि तिच्या प्रेमापोटी त्याने तिला गुप्त माहिती शेअर करण्यास सुरूवात केली. माहिती मिळताच आर्मी इंटेलिजन्सच्या मदतीने या गुप्तहेराला रंगेहाथ अटक करण्यात आली.
माहितीनुसार, आरोपी विक्रम हा बिकानेरमधील रहिवासी असून त्याच्याकडे महाजन आर्मी परिसरातील वजन कॅन्टीनचे कंत्राट होते. तो लष्कराच्या परिसरात कॅन्टीन चालवायचा आणि संधी पाहून लष्कराच्या परिसरातून संवेदनशील फोटो आणि कागदपत्रे काढून पाकिस्तानी हँडलरकडे पाठवत होता. राजस्थान इंटेलिजन्स टीमने त्याच्या संभाषणाचा मागोवा घेतला तेव्हा ही बाब समोर आली.
असा झाला खुलासा
यानंतर राजस्थान इंटेलिजन्सने संपूर्ण घटना मिलिटरी इंटेलिजन्स बिकानेरला सांगितली आणि त्यानंतर संयुक्त कारवाईत या गुप्तहेरला रंगेहाथ पकडण्यात आले. अटकेच्या वेळी तो एका पाकिस्तानी महिलेला काही फोटो पाठवण्याचाही प्रयत्न करत होता. राजस्थान इंटेलिजन्सचे अतिरिक्त महासंचालक संजय अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, विक्रमचा मोबाईल अनेक दिवसांपासून ट्रॅक केला जात होता. त्याच्या फोनवरून सगळी माहिती मिळत होती.
हनीट्रॅपचा बळी
पाकिस्तानी महिलेसोबतचे विक्रमचे संभाषणही रेकॉर्ड करण्यात आले. यावेळी आरोपी स्वतः हनीट्रॅपचा बळी असल्याचे उघड झाले. त्याला हनीट्रॅपचा बळी बनवणाऱ्या पाकिस्तानी महिलेने त्याला गुप्तचर माहिती काढण्याचे प्रशिक्षणही दिले होते. आरोपी विक्रमला अटक केल्यानंतर त्याची चौकशी केली असता अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या, असे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी विक्रमने फेसबुकच्या माध्यमातून या महिलेशी संपर्क साधल्याचे समोर आले आहे. मेसेंजरवर चॅटिंग करत असताना दोघांनी आपले मोबाईल नंबर शेअर केले आणि नंतर बोलणे सुरू केले. संबंधित महिलेने विक्रमचे काही अश्लील फोटो आणि व्हिडीओ रेकॉर्ड केले होते आणि आता ते व्हायरल करण्याची धमकी देऊन त्याला देशविरोधी कारवाया करण्यास ती भाग पाडत होती.