विक्रमी योगोत्सव
By admin | Published: June 22, 2015 03:28 AM2015-06-22T03:28:18+5:302015-06-22T03:28:18+5:30
१९२ देशांमधील २२५ शहरांमध्ये साजऱ्या झालेल्या योग दिनात कोट्यवधी लोकांनी योगासने करून भारताच्या या मोहिमेत भरीव योगदान दिले.
नवी दिल्ली : भारताच्या पुढाकाराने संयुक्त राष्ट्र संघाने जाहीर केलेल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त रविवारी जगभर योगोत्सव साजरा झाला. १९२ देशांमधील २२५ शहरांमध्ये साजऱ्या झालेल्या योग दिनात कोट्यवधी लोकांनी योगासने करून भारताच्या या मोहिमेत भरीव योगदान दिले.
भारतात झालेल्या मुख्य कार्यक्रमात दिल्लीतील राजपथावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि योगगुरू रामदेवबाबा यांच्या उपस्थितीत ३५ हजारांवर लोकांनी सामुदायिक योगासने करीत नवा इतिहास रचला. देशाच्या कानाकोपऱ्यात झालेल्या अशाच कार्यक्रमांना लोकांनी उत्साह दाखवत मोठी गर्दी केली होती. मोदींनी गेल्या वर्षी संयुक्त राष्ट्राच्या महासभेत २१ जून आंतरराष्ट्रीय योगदिन म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. १७७ देशांनी त्याला समर्थन दिले होते. प्रत्यक्षात त्याहूनही अधिक देशांमध्ये या योगदिन साजरा केला केला गेला. विदेशमंत्री सुषमा स्वराज यांनी न्यूयॉर्क येथे संयुक्त राष्ट्राकडून आयोजित कार्यक्रमाला हजेरी लावली.संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस बान की मून पहिला आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करताना भलतेच उत्साहात होते, त्यांनी आपला आनंद श्रीमती सुषमा स्वराज यांच्याजवळ व्यक्त केला. आंतरराष्ट्रीय योग दिनामुळे संपूर्ण जगात अपूर्व उत्साहाची लाट आली आहे, असे बान की मून यांनी म्हटले.
उत्तर प्रदेश सरकारने योगदिनाला विरोध केला असतानाही तेथील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. महाराष्ट्र, बिहार, छत्तीसगड, उत्तराखंड, राजस्थान, पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश आणि झारखंडमध्येही विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. लखनौच्या के के डी सिंग बाबू स्टेडियमवर आयोजित कार्यक्रमात गृहमंत्री राजनाथसिंग सहभागी झाले होते. मुस्लिमांनीही या कार्यक्रमात सहभागी होत राजकीय अभिनिवेष बाजूला सारला. काही धर्मगुरूंनी योगाची सुरुवात ‘ओम’ने करण्यावर आक्षेप घेतला होता. पंतप्रधान मोदींचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीमध्ये विविध योग कार्यक्रमांत उत्साहाचे वातावरण दिसून आले. पश्चिम उत्तर प्रदेशची काही गावे स्वातंत्र्यानंतर प्रथमच वेगळ्या वातावरणाने भारली गेली. गावांगावांमधून पारंपरिक गीत गात आणि नृत्य करीत महिला, मुले आणि युवक कार्यक्रमात सहभागी झाले. महिलांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता.
बिहारच्या पाटणा शहरातील मोईनुलहक स्टेडियमवर आयोजित कार्यक्रमात भाजपाध्यक्ष अमित शहा सहभागी झाले होते. माजी उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी आणि भाजपचे अन्य नेतेही उपस्थित होते. भोपाळ येथील लाल परेड मैदानावर मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांची प्रमुख उपस्थिती होती. रायपूर येथील कार्यक्रमात छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमणसिंग यांच्यासह अनेक मंत्री आणि १४ हजारावर शाळकरी मुले सहभागी झाली होती. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर सामूहिक योग कार्यक्रमात मुख्यमंत्री वसुंधरा राजे सहभागी झाल्या. उत्तराखंडच्या ऋषिकेश येथे परमार्थ आश्रमाचे अध्यक्ष चिदानंद सरस्वती यांच्या उपस्थितीत शेकडो साधकांनी गंगेच्या किनाऱ्यावर योगाभ्यास केला. (लोकमत यूज नेटवर्क)