भारीच! छोट्याशा गावची लेक झाली मोटर मॅकेनिक; भावाच्या मृत्यूनंतर त्याचं पॅशन बनवलं स्वत:चं प्रोफेशन
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2022 05:55 PM2022-06-01T17:55:05+5:302022-06-01T17:56:33+5:30
एका छोट्याशा गावची लेक मोटर मॅकेनिक झाली असून भावाच्या मृत्यूनंतर त्याचं पॅशन तिने स्वत:चं प्रोफेशन बनवलं आहे. मुलीला तिच्या भावाने बाईक चालवायला शिकवलं होतं.
नवी दिल्ली - बाईक मेकॅनिक हे शब्द ऐकल्यावर आपण बऱ्याचदा एक पुरुष मेकॅनिक पाहिला असेल. पण आता एक कौतुकास्पद घटना समोर आली आहे. एका छोट्याशा गावची लेक मोटर मॅकेनिक झाली असून भावाच्या मृत्यूनंतर त्याचं पॅशन तिने स्वत:चं प्रोफेशन बनवलं आहे. मुलीला तिच्या भावाने बाईक चालवायला शिकवलं होतं. बाईकच्या प्रत्येक भागाची ओळख करून दिली होती. भावाच्या मृत्यूनंतर तिने भावाचे काम आनंदाने स्वीकारलं आणि तिच्या कामाचं आता सर्वत्र भरभरून कौतुक होत आहे. परिसरात ती अत्यंत लोकप्रिय झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, इंद्रावती वरकाडे असं या मुलीचं नाव असून ती मध्य प्रदेशातील मांडला जिल्ह्यातील आहे. ती लहान असताना तिचा भाऊ मनोज तिला गाडीवरून फिरायला न्यायचा. त्याला गाडीची खूप आवड होती, त्यामुळे त्याच्या माध्यमातून इंद्रावती वाहनांच्या जवळ आली. पण अचानक मनोजचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. भावाच्या मृत्यूनंतर कुटुंबाची जबाबदारी इंद्रावतीवर आली. घरात आई-वडील आणि लहान भाऊ. अशा परिस्थितीत इंद्रावतीने काहीतरी करायचं ठरवलं.
इंद्रावतीने सायन्स विषयात आपली बॅचलरची डिग्री पूर्ण केली. गावातील काही निवडक मुलींपैकी ती एक आहे, ज्यांनी विज्ञानाचे शिक्षण घेतले. भावाच्या मृत्यूतून सावरण्यासाठी त्यांना 4 वर्षांहून अधिक काळ लागला. इंद्रावतीने दिलेल्या माहितीनुसार, तिला एका एनजीओबद्दल माहिती मिळाली. युवा शास्त्र कार्यक्रम ज्यामध्ये ग्रामीण युवकांना त्यांच्या आवडीनुसार कौशल्ये विकसित करण्यास आणि अभ्यास करण्यास मदत केली जाते, परंतु त्यांच्यासाठी मार्केटमध्ये काय चांगले होईल हे सांगून त्यांना तयार केले जाते.
"मला माझ्या कुटुंबाची काळजी घ्यायची होती. भावाच्या मृत्यूनंतर कुटुंबाला आधाराची गरज होती. मग तो आधार आर्थिक असो वा भावनिक. अशा परिस्थितीत मोटर मेकॅनिक बनणे हे माझ्या मनात सर्वप्रथम आले. मी एनजीओच्या संपर्कात आले आणि चांगली गोष्ट म्हणजे मला प्रशिक्षण घेता आलं. सुरुवातीला घरच्यांना हे काम आवडले नाही. पण आईने साथ दिली" असं इंद्रावतीने म्हटलं आहे. 6 महिन्यांच्या प्रशिक्षणानंतर इंद्रावतीला जबलपूरमधील दुचाकी सेवा केंद्रात नोकरी मिळाली. तेथे ती मोटार बाईक मेकॅनिक म्हणून काम करत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.