मोदींनी उल्लेख केलेले गाव अजूनही अंधारात
By admin | Published: August 18, 2016 06:08 AM2016-08-18T06:08:28+5:302016-08-18T06:08:28+5:30
हाथरसमध्ये नागला फटेला नावाचे खेडे आहे. दिल्लीहून तीन तासांत तेथे पोहोचता येते; मात्र या गावात वीज पोहोचण्यासाठी ७० वर्षे लागली, असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी
- शीलेश शर्मा, नवी दिल्ली
हाथरसमध्ये नागला फटेला नावाचे खेडे आहे. दिल्लीहून तीन तासांत तेथे पोहोचता येते; मात्र या गावात वीज पोहोचण्यासाठी ७० वर्षे लागली, असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात केले होते. त्यांच्या या विधानाने गावातील अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला, कारण यातील अनेक जण आजही विजेविना जगत आहेत.
या गावात ६०० घरे असून, त्यातील ४५० घरांत आजही वीज नाही. ज्या १५० घरांत वीज आहे ती त्यांनी विंधन विहिरीसाठी बसविलेल्या रोहित्रावर आकडे टाकून घेतली असून, त्याबदल्यात ते दक्षिणांचल विद्युत वितरण निगमला दर दोन महिन्याला ३९५ रुपये देतात, असे गावचे सरपंच योगेश कुमार यांनी एका दैनिकाला सांगितले. कदाचित पंतप्रधानांना आमच्या गावातील परिस्थितीची कल्पना दिली गेली नसेल, असे गावातील एक रहिवासी उलानूर उस्मानी यांनी सांगितले.
नागला फटेला हे साडेतीन हजार लोकसंख्येचे गाव राजधानी दिल्लीपासून ३०० कि.मी. अंतरावर आहे. या गावात ९०० नोंदणीकृत मतदार आहेत. पंतप्रधान ग्रामीण विद्युतीकरण मोहिमेअंतर्गत पायाभूत सुविधा पुरविण्यात आलेल्या १०,०४५ गावांत नागला फटेलाचा समावेश आहे. कळस म्हणजे पंतप्रधान कार्यालयाने या गावातील ग्रामस्थ टीव्ही पाहत असल्याची छायाचित्रे स्वातंत्र्यदिनी शेअर केली. ही छायाचित्रे पाहिल्यानंतर ‘हसावे की रडावे’, अशी अवस्था ग्रामस्थांची झाली. ही छायाचित्रे आमच्या गावची नाहीत. फुगे असलेले छायाचित्र नागला सिंधी या गावचे असू शकते. हे गावही हाथरसमध्ये असून, याच योजनेअंतर्गत त्याचे विद्युतीकरण झाले आहे, असे नागला फटेलाचे माजी सरपंच देवेंद्रसिंह यांनी सांगितले. वीज वितरण कंपनीचे मुख्य अभियंता व्ही. एस. गंगवार यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले की, १९८५ मध्येच या गावाला वीज पुरवठा करण्यात आला आहे.
अद्याप दूरचे स्वप्नच
ऊर्जा मंत्रालयानुसार १८ हजार ४७५ गावांचे संपूर्ण विद्युतीकरण मे २०१७ पर्यंत पूर्ण होणार आहे. ‘दीनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजनेअंतर्गत आमच्या गावच्या विद्युतीकरणासाठी सरकारने व्यवस्था केली, हे खरे आहे. आम्हाला विद्युत खांब, वीजतारा आणि मीटर मिळाले; परंतु वीज पुरवठा अद्यापही आमच्यासाठी दूरचे स्वप्न आहे, असे सरपंच कुमार यांनी म्हटले.